पाककडून पूँच आणि कुपवाडा जिल्ह्यांत गोळीबार

वृत्तसंस्था
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

पाकिस्तानी लष्कराने या महिन्यात तीन वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. 1 सप्टेंबरला पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक कमलजितसिंह गोळी लागून जखमी झाले होते. त्यानंतर आज एकाच दिवशी दोन वेळा शस्त्रसंधीचा भंग करण्यात आला

जम्मू - पाकिस्तानचा खोडसाळपणा सुरूच असून, आज त्यांच्या सैनिकांनी जम्मू-काश्‍मीरमधील पूँच आणि कुपवाडा जिल्ह्यांतील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा भंग केला. यामध्ये कोणत्याही हानीचे वृत्त नाही.

पाकिस्तानी लष्कराने आज सकाळी 8.50 पासून दहा वाजेपर्यंत पूँचमधील कृष्णा घाटीतील भारतीय चौक्‍यांच्या दिशेने गोळीबार करत तोफगोळ्यांचा मारा केला, अशी माहिती संरक्षण प्रवक्‍त्याने दिली. भारतीय लष्करानेही या गोळीबाराला चोख आणि परिणामकारक प्रत्युत्तर दिल्याचेही त्यांनी सांगितले.

कुपवाडा जिल्ह्यातही पाकने आज शस्त्रसंधीचा भंग केला. कुपवाडातील कर्नाह सेक्‍टरमध्ये नियंत्रण रेषेवर मध्यरात्रीपासून आज सकाळपर्यंत पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नसल्याचे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. या ठिकाणीही भारतीय जवानांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानी लष्कराने या महिन्यात तीन वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. 1 सप्टेंबरला पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक कमलजितसिंह गोळी लागून जखमी झाले होते. त्यानंतर आज एकाच दिवशी दोन वेळा शस्त्रसंधीचा भंग करण्यात आला. त्यापूर्वी 30 ऑगस्टलाही पाकिस्तानी सैनिकांनी नौशेरा सेक्‍टरमधील चौक्‍या आणि नागरीवस्तीला लक्ष्य करत गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला होता. 27 ऑगस्टला केलेल्या गोळीबारात पूँच जिल्ह्याच्या शाहपूर पट्ट्यात एक महिला आणि दोन मुलांसह पाच नागरिक जखमी झाले होते. त्याच्या एक दिवस आधी 26 ऑगस्टला भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शस्त्रसंधी भंगाला चोख प्रत्युत्तर देताना पाकच्या तीन सैनिकांना ठार केले होते.

संधी भंगाच्या घटनांत वाढ
2017 या वर्षांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 1 ऑगस्टपर्यंत पाकिस्तानने 285 वेळा गोळीबार केला असून, 2016 या संपूर्ण वर्षांत शस्त्रसंधी भंगाच्या 228 घटना घडल्या होत्या.

Web Title: Pakistan violates ceasefire again