व्हॉट्सॲप, फेसबुकला पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी शोधला नवा पर्याय

व्हॉट्सॲप, फेसबुकला पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी शोधला नवा पर्याय

श्रीनगर - ‘व्हॉटस्‌ॲप’सारख्या सोशल मीडिया कंपन्यांतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये खासगीपणा कितपत राखला जातो, याबाबत नागरिक शंका उपस्थित करत असताना दहशतवादी संघटना मात्र नवीन ॲपकडे वळाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी संघटना आणि त्यांचे सूत्रधारांनी तुर्कस्तानमधील एका कंपनीने तयार केलेल्या मेसेजिंग ॲपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. 

लष्कराने गेल्या काही दिवसांत ठार मारलेल्या किंवा शरण आलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या मोबाईलच्या तपासणीतून ही माहिती पुढे आली आहे. या ॲपच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी संघटना युवकांना चिथावणीही देत असल्याचे पुढे आले आहे. दहशतवादी तीन वेगवेगळे ॲप वापरत असल्याचे स्पष्ट झाले असून सुरक्षेच्या कारणास्तव या ॲपची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. या तीन ॲपपैकी एक ॲप अमेरिकेतील, तर दुसरे ॲप ब्रिटनमधील कंपनीचे आहे. तिसरे ॲप तुर्कस्तानमधील कंपनीने तयार केले असून त्याचाच सध्या दहशतवादी संघटना अधिकाधिक वापर करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या ॲपच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांमध्ये भरतीही केली जाते. 

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी व्हॉट्‌सॲप आणि फेसबुक मेसेंजर या ॲपचा वापर करणे जवळपास बंद केले आहे. या कारणाचा शोध घेतला असता त्यांनी इंटरनेटवर फुकट उपलब्ध असलेल्या काही ॲपचा वापर सुरु केल्याचे उघड झाले. या ॲपमध्ये तयार होणारा मजकूर संबंधित मोबाईल अथवा संगणकावरच रहात असल्याने तो गुप्त राहतो. या ॲपद्वारे आरएसए-२०४८ हा एन्क्रिप्शन अल्गोरिदम वापरला जातो. काही ॲपमध्ये तर ते वापरण्यासाठी फोन क्रमांक आणि ईमेलचीही आवश्‍यकता नसते. त्यामुळे वापरणारा गुप्तच राहतो. जम्मू -काश्‍मीरमध्ये अशा ॲपवर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

व्हर्च्युअल सिमकार्डचा वापर 
काश्‍मीर खोऱ्यातील व्हर्च्युअल सिमकार्डच्या वापराविरोधात भारतातील तपास यंत्रणा लढत आहेत. पाकिस्तानमधील आपल्या सूत्रधारांशी संपर्क साधण्यासाठी काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवादी संघटना या व्हर्च्युअल सिमकार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. पुलवामा हल्ल्याच्या तपासावेळी हा प्रकार उघडकीस आला. या हल्ल्यावेळी ४० व्हर्च्युअल सिमकार्डचा वापर झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com