'लोक जनाधार'चे पप्पू यादव यांची तुरुंगात रवानगी

उज्ज्वल कुमार - सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 मार्च 2017

पोलिस आपली हत्या करणार असल्याचा केला आरोप

पाटणा- नितीश सरकारच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोक जनाधार पक्षाचे नेते आमदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांना पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली. पोलिसांना आपली हत्या करायची होती, असा आरोप यादव यांनी केला आहे.

पोलिस आपली हत्या करणार असल्याचा केला आरोप

पाटणा- नितीश सरकारच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोक जनाधार पक्षाचे नेते आमदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांना पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केली. पोलिसांना आपली हत्या करायची होती, असा आरोप यादव यांनी केला आहे.

लोक जनाधार पक्षाच्या वतीने नितीश सरकारच्या विरोधात विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी यादवसमर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मोर्चाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यात काही जण जखमी झाले होते. पोलिसांनी पाण्याचा फवाराही मारला. त्या वेळी तेथून निसटलेल्या पप्पू यादव यांना अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी गेले असता, आपली प्रकृती बिघडली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी रात्रीच त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा त्यांचा रक्तदाब वाढला होता. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येऊन नंतर तुरुंगात नेण्यात आले.

पोलिस सोमवारी (ता. 26) रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी पोचल्यावर यादव यांनी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना दूरध्वनी करून पोलिसांना आपली हत्या करायची असल्याची तक्रार केली. पोलिस माझ्याबरोबर काहीही करू शकतात. तुम्ही मातेसमान आहात, मला मदत करा, अशी विनंती केली. त्याच वेळी त्यांनी मैथिली भाषेमध्ये "गोड छू के प्रणाम करियो छै' (चरणस्पर्श करून नमस्कार करत आहे), असे महाजन यांना म्हटले होते.

पोलिसांच्या निषेधार्थ "काळा दिवस'
पोलिसांच्या लाठीमाराच्या विरोधात लोक जनाधार पक्षाने आज काळा दिवस पाळत राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून जिल्हा मुख्यालयांसमोर निदर्शने केली. पोलिसांनी शांत आणि निःशस्त्र कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याचा आरोप पक्षाचे अध्यक्ष श्रीभगवानसिंह कुशवाहा यांनी केला.

Web Title: pappu yadav arrested