परेश रावल यांच्या ट्विटवरून भाजपची हुकूमशाही मानसिकता उघड : काँग्रेस

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांनी लेखिका अरुंधती रॉय यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. रावल यांच्या ट्‌विटवरून भाजपची हुकूमशाही मानसिकता दिसत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांनी लेखिका अरुंधती रॉय यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. रावल यांच्या ट्‌विटवरून भाजपची हुकूमशाही मानसिकता दिसत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

काश्‍मीर खोऱ्यात भारतीय लष्करावर दगडफेक करणाऱ्यांना लष्कराच्या जीपसमोर बांधण्याऐवजी ज्येष्ठ लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांना बांधण्यात यावे, अशी परखड टीका प्रसिद्ध अभिनेते व संसद सदस्य परेश रावल यांनी सोमवारी केली होती. या पार्श्‍वभूमीवर वृत्ततसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेत्या शोभा ओझा म्हणाल्या, "जे काही परेश रावल बोलले आहेत; त्यावरून भाजपची हुकूमशाही मानसिकता दिसून येते. त्यातून भारतीय जनता पक्षाची हुकूमशाही दिसून येते.

संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनीही ओझा यांच्याप्रमाणेच टीका केली आहे. ते म्हणाले, "परेश रावल यांचे ट्विट निषेधार्ह आहे. रावल हे चित्रपट चालत नाही, म्हणून राजकारणात आलेले अभिनेते आहेत. त्यांना राजकारणाबद्दल आणि जनतेबद्दल काय माहिती आहे? त्यांना काहीही माहिती नाही. अशा प्रकारचे वक्तव्यामध्ये त्यांनी सुधारणा करणे आवश्‍यक आहे.' दरम्यान, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रावल यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

Web Title: Paresh Rawal's tweet clear picture of BJP's 'dictatorial mentality': Congress