अवघ्या चौदा महिन्यांच्या परीचा मृत्यूशी संघर्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पाकच्या हल्ल्यात गमावले नातेवाईक; आई-वडीलही जखमी
जम्मू - रक्तपिपासू पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधीचा भंग करत मुद्दामहून भारतातील नागरी भागांना लक्ष्य केले होते. पाकच्या तोफगोळ्यांनी आठपेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला असून, निष्पाप लहान मुलेही यामध्ये गंभीर जखमी झाली आहेत. अशाच एका हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या चौदा महिन्यांच्या परी या चिमुरडीचा सध्या मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या कृत्याचा सर्वस्तरातून निषेध होतो आहे.

पाकिस्तानी सैनिकांनी 1 नोव्हेंबर रोजी रंगूर छावणीतील खेड्याला लक्ष्य करत केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात या चिमुरडीचे आजोबा, काकू आणि दोन चुलत भाऊ आधीच मृत्युमुखी पडले आहेत.

येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या चिमुरडीवर नुकतीच एक जटिल शस्त्रक्रियाही करण्यात आली. अवघे चौदा महिने वय असलेल्या परीवर सध्या काय संकट कोसळले आहे याची तिला देखील कल्पना नाही. आपले निकटवर्तीय गोळीबारामध्ये गमावलेल्या या चिमुरडीचे आई-वडील देखील पाकच्या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती बलजितकुमार यांनी दिली. पाकच्या हल्ल्यात जखमी झालेल्या परीच्या मानेला, पोटाला आणि पाठीच्या मणक्‍यास गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या पोटातील आतड्यालाही मार लागला असून, सध्या तिला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. गोळीबारामध्ये जखमी झालेले परीचे वडील राकेशकुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली.

नृशंसतेचे प्रतीक
पाकिस्तानच्या लष्कराने सीमावर्ती भागातील नागरिकांना स्थलांतरासाठी थोडा देखील वेळ दिला नाही. बेसावध अवस्थेत त्यांना लक्ष्य केल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. हे पाकिस्तानी लष्कराच्या नृशंस कृत्याचे प्रतीक असल्याचे परीच्या नातेवाईक गीताकुमारी यांनी सांगितले. परीच्या वडिलांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना आपल्या चिमुरडीवर कशापद्धतीने उपचार सुरू आहेत, हे देखील पाहता येणे शक्‍य होत नाही.

लोकांची प्रार्थना
दुःख आणि वेदनेचे प्रतीक बनलेल्या परीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून जम्मूतील हजारो नागरिक प्रार्थना करत आहेत. या निष्पाप जिवांना शस्त्रसंधी उल्लंघनाची थोडीही पूर्वकल्पना नव्हती. केवळ पाकिस्तानच्या युद्धवेडापायी त्यांचा बळी गेला असल्याचे पाकच्या गोळीबारात जखमी झालेल्या प्रदीपकुमार यांनी सांगितले. दरम्यान, परी आणि तिच्या कुटुंबीयांवरील उपचाराची जबाबदारी जम्मू-काश्‍मीर सरकारने स्वीकारली आहे.

पाकिस्तानने लहान मुलांना लक्ष्य करणे हे अत्यंत क्रूरपणाचे कृत्य आहे. पाकिस्तान रसातळाला गेलेला देश असून, त्यांनी जाणीवपूर्वक खेड्यांतील नागरिकांना लक्ष्य केले आहे.
- निर्मलसिंह, उपमुख्यमंत्री, जम्मू-काश्‍मीर

Web Title: pari death struggle just fourteen months