"स्वातंत्र्यानंतरचा एक सर्वात मोठा राजकीय नेता गमावला"; राष्ट्रपती, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक : Parkash Singh Badal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parkash Singh Badal

Parkash Singh Badal: "स्वातंत्र्यानंतरचा एक सर्वात मोठा राजकीय नेता गमावला"; राष्ट्रपती, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. देशाच्या या दोन्ही बड्या नेत्यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा राजकीय नेता देशानं गमावला, अशा शब्दांत त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. (Parkash Singh Badal death President Murmu and PM Modi expressed condolences)

राष्ट्रपती मुर्मू यांनी ट्विट करत म्हटलं, "प्रकाशसिंग बादल हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे राजकीय नेते होते. सार्वजनिक सेवेतील त्यांची अनुकरणीय कारकीर्द मुख्यत्वे पंजाबपुरती मर्यादित असली तरी देशभरात त्यांचा आदर होता. त्यांच्या निधनानं पोकळी निर्माण झाली आहे"

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करताना म्हटलं की, "प्रकाशसिंग बादल यांच्या निधनानं अत्यंत दु:ख झालं. ते भारतीय राजकारणातील एक मोठं व्यक्तिमत्त्व आणि एक उल्लेखनीय राजकारणी होते, त्यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिलं. पंजाबच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि अत्यंत कठीण काळात राज्याची धुरा सांभाळली. प्रकाशसिंग बादल यांचं निधन हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. मी अनेक दशकांपासून त्यांच्याशी जवळून संवाद साधला आहे आणि त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. मला आमची असंख्य संभाषणे आठवतात, ज्यात त्याचे शहाणपण नेहमीच स्पष्टपणे दिसत होते"

तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, "पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचं निधन झाल्याचं वृत्त दुःखदायक आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात चांगलं काम केलं आहे. माझ्या आणि माझ्या पक्षाच्यावतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो"

दरम्यान, दीर्घकाळापासून आजारी असल्यानं प्रकाशसिंग बादल यांच्यावर मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री त्यांचं उपचारांदरम्यान निधन झालं.

टॅग्स :PunjabDesh news