
संसदेच्या (Parliament canteen) सर्व खासदारांसहित कर्मचाऱ्यांना कँटीनमधील पदार्थांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
नवी दिल्ली- संसदेच्या (Parliament canteen) सर्व खासदारांसहित कर्मचाऱ्यांना कँटीनमधील पदार्थांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या किंमतीच्या यादीनुसार आता संसदेच्या कँटिनमध्ये 100 रुपयांना शाकाहारी थाळी आणि 700 रुपयांमध्ये मांसाहारी बुफे मिळणार आहे. नुकतेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी संसदेतील कँटीनची सब्सिडी बंद करण्याची घोषणा केली होती. ओम बिर्ला यांनी सांगितलं होतं की, संसदेची कँटीग आता उत्तर रेल्वे चालवणार नसून भारतीय पर्यटन विकास निगम चालवेल.
लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आलेल्या अन्न पदार्थांच्या किंमतीच्या यादीनुसार, 27 जानेवारीपासून येथे 58 विविध प्रकारचे अन्नपदार्थ उपलब्ध असतील. ज्यात मांसाहारी आणि शाकाहारी जेवणाचा समावेश आहे. आता बुफे लंच 700 रुपयांना मिळेल. शाकाहारी बिर्याणीची किंमत 50 रुपये, तर चिकन बिर्याणीच्या एका प्लेटची किंमत 100 रुपये असणार आहे. शाकाहारी थाळी आता 100 रुपये, चिकन करी 75 रुपये आणि मटन बिर्याणी 150 रुपयांना मिळणार आहे.
याआधी एक प्लेट चिकन करी 50 रुपये, चिकन बिर्याणी 65 रुपये, शाकाहारी थाळी 35 रुपये, सलाड 9 रुपये, चपाती 2 रुपयांना मिळायची. नव्या दरांनुसार, बुफे (मांसाहारी) 700 रुपये आणि बुफे (शाकाहारी) 500 रुपये आणि मिनी शाकाहारी थाळी 50 रुपयांना मिळणार आहे.