हल्ल्याचे राज्यसभेत पडसाद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - जम्मूतील नगरोटाच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा मुद्दा काढून काँग्रेसने आज राज्यसभा रोखली.

नवी दिल्ली - जम्मूतील नगरोटाच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा मुद्दा काढून काँग्रेसने आज राज्यसभा रोखली.

त्याचवेळी प्राप्तिकर दुरुस्ती विधेयक वित्त विधेयक म्हणून मंजूर करण्याच्या सरकारच्या कृतीला जोरदार आक्षेप घेताना राज्यसभेच्या अधिकारांबाबत नव्याने चर्चा करण्याची जोरदार मागणी विरोधी सदस्यांनी उचलून धरली आहे. पंतप्रधानांकडून माफीची मागणी पूर्ण होणे, पर्यायाने कामकाज सुरळीत होणे या दोन्ही बाबी आता केवळ अशक्‍य दिसत आहेत. परिणामी, वस्तू व सेवाकराबाबतची (जीएसटी) उर्वरित विधेयकेही वित्त विधेयकाच्याच रस्त्याने जातील, असे स्पष्ट संकेत सरकारकडून मिळाल्याने विरोधक आणखी बिथरले आहेत. 

नगरोटा येथे दहशतवाद्यांविरुद्धची लष्करी कारवाई अद्याप सुरू आहे व ती संपत नाही; तोवर श्रद्धांजलीचा ठराव संसदेत मांडता येत नाही, असे सरकारने वारंवार स्पष्ट करूनही विरोधक आपल्या मागणीवर अडून राहिल्याने सलग दहाव्या दिवशी राज्यसभा ठप्प झाली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विरोधकांनी केली. मात्र या वेळी काँग्रेस सदस्यांनी दिलेल्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणांना खुद्द भाजप सदस्यांनीही पाठिंबा दिला.  लोकसभेने काल ध्वनीमताने मंजूर केलेले प्राप्तिकर दुरुस्ती विधेयक राज्यसभेत उपचार म्हणून आज मांडण्यात आले. याबाबत या सभागृहाला शून्य अधिकार आहेत. यावरून सदस्य संतप्त झाले. एखादे विधेयक वित्त विधेयक म्हणून मंजूर करण्याचे सर्वाधिकार लोकसभेला देणाऱ्या राज्यघटनेतील संबंधित कलमावर चर्चा करा, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली. या वेळी गोंधळ वाढल्यावर भाजपचे विनय सहस्रबुद्धे म्हणाले, की सत्तारूढ सदस्यांना आपली मते मांडण्यास आडकाठी केली जाते, हे अन्याय्य व आक्षेपार्ह आहे. विरोधकांना बोलण्याचा अधिकार घटनेने दिलेला असला तरी कोणत्याही सदस्याची मुस्कटदाबी करण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाही, अशीही तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. 

समाजवादी पक्षाचे नरेश अगरवाल म्हणाले, की प्राप्तिकर दुरुस्ती विधेयक वित्त विधेयक केल्याने राज्यसभेचा अवमान झाला आहे. सरकार अशी मनमानी करत असेल, तर घटनेतील याबाबतच्या कलमाची चिकित्सा होणे अत्यावश्‍यक आहे. त्यांना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व काँग्रेस सदस्यांनीही पाठिंबा दिला. प्रमोद तिवारी यांनी, हे सभागृह राज्यघटनेनुसार, नियमाने, परंपरेने चालते, असे सांगताच उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी, ‘आजकाल तर ते घोषणाबाजीनेही चालते,’ असा चिमटा काँग्रेसला काढला.

यादव-जेटली चकमक

जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव व अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात आज शाब्दिक चकमक उडाली. यादव यांनी नोटाबंदीमुळे रांगांमध्ये मरण पावलेल्यांचा मुद्दा उपस्थित करताच जेटली यांनी ताडकन, ‘नोटाबंदीवरील चर्चा तुम्ही तुमच्याच पक्षात करा. तुमच्या विरोधाच्या भूमिकेला तुमच्या पक्षाचा तरी पाठिंबा आहे का हे विचारा,’ असे त्यांना सुनावले. चिडलेल्या यादव यांनी नोटाबंदीवर पंतप्रधानांनी तुम्हाला तरी विश्‍वासात घेतले होते का, तुमचे पंतप्रधान तुमच्या बरोबर आहेत का, असे प्रतिप्रश्‍न करून त्यांना प्रत्युत्तर दिले.

Web Title: Parliament session