संसदेचे अधिवेशन 31 जानेवारीपासून

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जानेवारी 2017

नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन या वर्षापासून लवकर सुरू करण्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर, संसद अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. दोन टप्प्यांत चालणाऱ्या या अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत असेल, तर दुसरा टप्पा लवकरच जाहीर केला जाणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पाचे केंद्रीय अर्थसंकल्पात विलीनीकरण हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य असेल.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहारविषयक समितीची (सीसीपीए) आज बैठक होऊन त्यात अर्थसंकल्पी अधिवेशन बोलाविण्यासाठी राष्ट्रपतींना शिफारस करण्यावर विचारविनिमय झाला. गृहमंत्री राजनाथसिंह, संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अर्थमंत्री अरुण जेटली या बैठकीला उपस्थित होते. अर्थसंकल्पी अधिवेशनाचा 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी हा पहिला टप्पा असेल. परंतु नव्या वर्षात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहता आचारसंहितेचा कालावधी विचारात घेऊनच दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या जातील असे कळते.

प्रथेप्रमाणे नव्या वर्षातील अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होत असतो. त्यानुसार 31 जानेवारीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला उद्देशून भाषण करतील. त्याच दिवशी आर्थिक पाहणी अहवालही सादर केला जाईल. त्यानंतर एक फेब्रुवारीला अर्थमंत्री अरुण जेटली हे केंद्रीय अर्थसंकल्प मांडतील. रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला असल्याने रेल्वे मंत्रालयाच्या सर्व आर्थिक तरतुदींचा केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच विचार केला जाणार आहे. तब्बल, 92 वर्षांपूर्वीची परंपरा या निमित्ताने संपुष्टात येत आहे.

त्याचप्रमाणे, एक एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याआधीच वित्त विधेयक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने वित्त विधेयक मंजुरीआधी खर्चाच्या तोंडमिळवणीसाठी लेखानुदान मंजुरीची गरज सरकारला भासणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी नोटाबंदीच्या निर्णयानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने करांमधील सवलत, त्याचप्रमाणे मोदींच्या 31 डिसेंबरच्या भाषणात जाहीर केलेल्या कृषिक्षेत्र, लघू व मध्यम उद्योगक्षेत्र, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, गृहकर्ज याबाबतच्या घोषणांच्या अंमलबजावणीचा आराखडादेखील अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे.

Web Title: Parliament Session to commence from 31st Jan