लालूंच्या शिक्षेवरील सुनावणी पुन्हा टळली

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

वर्णाक्षर क्रमाचा अडथळा; आज घोषणा शक्‍य

वर्णाक्षर क्रमाचा अडथळा; आज घोषणा शक्‍य

पाटणा : पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेवरील सुनावणी आज पुन्हा टळली. आता उद्या (ता. 5) यावर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. न्यायालयाने आरोपीच्या नावांतील पहिल्या वर्णाक्षरानुसार आज "अ ते क' दरम्यान ज्यांची नावे आहेत, त्यांना शिक्षा सुनावण्यास सुरवात केल्याने लालूंबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली. लालूंनी आजच शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती; पण न्यायालयाने ती फेटाळून लावली. उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनही शिक्षेची घोषणा केली जाऊ शकते, असे न्यायमूर्तींनी या वेळी सांगितले; पण लालूंनी आपण सुनावणीच्यावेळी उपस्थित राहू असे सांगितले.

आज न्यायालयातील सुनावणीदरम्यान विशेष सीबीआय न्यायाधीश शिवपालसिंह म्हणाले, की लालूंचे समर्थकच मला फोन करून पुढे काय होणार, असा प्रश्‍न विचारतात, या वेळी मलाच काही माहीत नसल्याचे मी त्यांना सांगतो. स्वत:चे समर्थन करताना लालू म्हणाले, की या प्रकरणात मी निर्दोष असून, जगदीश शर्मा यांनी हेराफेरी केली. यावर न्यायाधीशांनीही मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना आपणच हे प्रकरण लटकवून ठेवले. या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन झाले असते, तर ती वेगळी गोष्ट होती असे सांगितले.

असाही संवाद
लालू : मला तुरुंगात लोकांना भेटूही दिले जात नाही.
न्यायाधीश : लोकांना भेटता यावे म्हणूनच तुम्हाला न्यायालयात आणतो
लालू : मी निर्दोष असून काहीही केलेले नाही
लालू : साहेब, तुरुंगामध्ये खूप थंडी वाजते
न्यायाधीश : मग तुरुंगामध्ये तुम्ही कोणती तरी डिग्री घ्या

कारणे दाखवा नोटिस
या गैरव्यवहारातील अन्य आरोपींनी तुरुंगामध्ये सोयीसुविधा दिल्या जात असताना भेदभाव केला जात असल्याची तक्रार केल्यानंतर न्यायालयाने बिरसा मुंडा तुरुंगाच्या निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सहा बनावट मंजुरी पत्रांचा वापर करून देवघर शासकीय कोशागारातून 89 लाख 4 हजार 413 रुपये काढल्याचा ठपका लालूप्रसाद आणि अन्य आरोपींवर ठेवण्यात आला आहे.

लालू झाले धार्मिक
न्यायालयात येण्यापूर्वी लालूंनी आज पुजाअर्चना केली तसेच हनुमान चालिसेचे पठणही केले. मागील काही दिवसांपासून लालूंनी मटण आणि मासे खाणे सोडून दिले आहे. आजच्या सुनावणीसाठी लालूप्रसाद उपस्थित राहणार असल्याने न्यायालयाच्या आवारामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तत्पूर्वी न्यायालयाच्या आवारामध्ये लालूंना आणण्यात येणार असल्याने सुरक्षा वाढविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाने केली होती. प्रशासनानेही त्याला मान्यता देत आज कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: patna news Lalu prasad yadav punishment hearing over again