काश्मीरमध्ये पीडीपीसोबत आघाडी नाही; काँग्रेसकडून स्पष्ट

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने सरकारचा पाठींबा काढून घेतल्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर मात्र काँग्रेस आणि पीडीपी मिळून सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र पीडीपीशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन करण्याचा कोणताही प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले आहेत. 

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने सरकारचा पाठींबा काढून घेतल्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर मात्र काँग्रेस आणि पीडीपी मिळून सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र पीडीपीशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापन करण्याचा कोणताही प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले आहेत. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमवेत काल (सोमवार) जम्मू आणि काश्मीरवरील काँग्रेसच्या कोअर समितीची बैठक झाली. राज्यात राज्यपालांची राजवट सुरू असताना काँग्रेसने लेह आणि लडाखमध्ये आगामी निवडणुकांच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत काँग्रेसच्या जम्मू आणि काश्मीरच्या प्रभारी अंबिका सोनी, ज्येष्ठ नेते डॉ. करण सिंह, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांचा समावेश होता. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद दिल्लीबाहेर असल्यामुळे या बैठकीला हजर राहिले नाहीत. मात्र, पीडीपीशी आता किंवा भविष्यात आघाडीचे सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. सध्या काँग्रेसचे जम्मू आणि काश्मीर विधानसभेत १२ आमदार आहेत. भाजप आणि पीडीपीच्या कार्यकाळात जम्मू काश्मीरमधील पूर्ण व्यवस्था मोडकळीस आली असल्याने तिथे सत्ता स्थापन करण्याची चूक काँग्रेस करणार नसल्याचेही पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: pdp congress alliance is impossible