अलिगढमधील घटनेचा देशभरातून निषेध; चौकशीसाठी 'एसआयटी'

crime
crime

आग्रा : उत्तर प्रदेशातील अलिगडमधील तप्पल येथील अवघ्या तीन वर्षांच्या बालिकेच्या निर्घृण हत्येची घटना उघड झाल्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस, प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व्यवस्थेविरोधात आज तीव्र जनक्षोभ उसळलेला पाहायला मिळाला. सर्वच स्तरांतून या घटनेचा निषेध झाल्यानंतर सरकारने आज पाच पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे निर्देश दिले. 

या प्रकरणामध्ये मारेकऱ्यांनी मुलीच्या देहाची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, या घटनेप्रकरणी झाहीद आणि अस्लम या दोघांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी आरोपींच्या अन्य कुटुंबीयांनादेखील अटक करण्यात यावी अशी मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. संबंधित बालिका ही 31 मे रोजीच बेपत्ता झाली होती, त्यानंतर 2 जून रोजी तिचा मृतदेह आढळून आला होता.

या प्रकरणामध्ये बालिकेच्या पित्याने झाहीदकडून चाळीस हजार उसने घेतले होते, आतापर्यंत त्यांनी आरोपीस 35 हजार रुपये परत केले असून, उर्वरित पाच हजार रुपयांची रक्कम परत करण्यासाठी त्यांनी अवधी मागितला होता. यावरून दोघांमध्ये भांडणही झाले होते. या भांडणातूनच बालिकेचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. दरम्यान, बालिकेला ठार मारण्यापूर्वी मारेकऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावरही आज या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. 

एखादी व्यक्ती मुलीसोबत एवढी क्रूर कशी काय वागू शकते? अशा प्रकारचे कृत्य करणारे गुन्हेगार कोणत्याही परिस्थितीमध्ये सुटायला नकोत. उत्तर प्रदेश पोलिसांनी मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी. 
- राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस 

अलीगढ येथे बालिकेवरील अमानवीय अत्याचाराने मला हादरून सोडले आहे, आम्ही हा कसल्या प्रकारचा समाज निर्माण करत आहोत? मुलीच्या आई-वडिलांवर नेमके काय बेतले असेल याची कल्पना करून थरकाप उडतो. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी. 
- प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com