'कॉलरवाली' वाघिण ठरली "सुपरमॉम'

पीटीआय
बुधवार, 31 जुलै 2019

अपत्यांची संख्या कमी ठेवण्याच्या सध्याच्या काळात मध्य प्रदेशातील "कॉलरवाली'ने मात्र तब्बल 29 अपत्यांना जन्म देऊन "सुपरमॉम' होण्याचा विक्रम केला आहे! ही "कॉलरवाली' म्हणजे वाघीण असून, तिने दहा वर्षांच्या काळात 29 बछड्यांना जन्म देऊन व्याघ्रकुळाची संख्या वाढविण्यात मोलाचा हातभार लावला आहे. 

शिवनी (मध्य प्रदेश) : अपत्यांची संख्या कमी ठेवण्याच्या सध्याच्या काळात मध्य प्रदेशातील "कॉलरवाली'ने मात्र तब्बल 29 अपत्यांना जन्म देऊन "सुपरमॉम' होण्याचा विक्रम केला आहे! ही "कॉलरवाली' म्हणजे वाघीण असून, तिने दहा वर्षांच्या काळात 29 बछड्यांना जन्म देऊन व्याघ्रकुळाची संख्या वाढविण्यात मोलाचा हातभार लावला आहे. 

मध्य प्रदेशच्या सिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील रहिवासी असलेली "कॉलरवाली' सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. 25 बछड्यांची ती आई होतीच; पण गेल्या डिसेंबरमध्ये तिने आणखी चार बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे तिच्या "अपत्यां'ची संख्या 29 वर गेल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आणि चौदा वर्षे वयाच्या "कॉलरवाली'ने हा विक्रम केल्याचा अंदाज व्यक्त केला. आखिल भारतीय व्याघ्रगणनेत केरळमधील पेरियार आणि मध्य प्रदेशातील पेंच हे दोन प्रकल्प उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी गौरविले गेले आहेत. 

'कॉलरवाली' हे या वाघिणीचे ओळखीसाठी ठेवलेले नाव आहे. तिने मे 2008 मध्ये प्रथम तीन बछड्यांना जन्म दिला आणि आता ती 29 बछड्यांची आई आहे. त्यातील 25 वाघ हयात आहेत. याचाच अर्थ, या प्रकल्पातील वाघांपैकी निम्मे "कॉलरवाली'चे वंशज आहेत. दहा वर्षांच्या आयुष्यात एवढ्या बछड्यांना जन्म देणारी दुसरी वाघीण मी पाहिली नाही, असे पेंच व्याघ्रप्रकल्पाचे संचालक विक्रमसिंह परिहार यांनी सांगितले. "कॉलरवाली'ला ऑक्‍टोबर 2010 मध्ये पाच बछडे झाले होते. हाही एक विक्रम असल्याचे ते म्हणाले. 
--- 
526 
मध्य प्रदेशातील वाघांची संख्या 

53 
पेंच प्रकल्पातील वाघांची संख्या 

29 
"कॉलरवाली'ची बछडी 

25 
हयात असलेली बछडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pench Tigress produce 29 Calves in Decade