कमी कपडे घालण्याची परवानगी देणे हा महिलांचा अवमान: अबू आझमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नवी दिल्ली - महिलांच्या वेशभूषेबाबत वादग्रस्त वक्तव्ये करणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पुन्हा एकदा याच विषयावर भाष्य केले आहे. महिलांना कमी कपडे परिधान करण्याची परवानगी देणारेच महिलांचा अवमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली - महिलांच्या वेशभूषेबाबत वादग्रस्त वक्तव्ये करणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पुन्हा एकदा याच विषयावर भाष्य केले आहे. महिलांना कमी कपडे परिधान करण्याची परवानगी देणारेच महिलांचा अवमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बंगळूरमध्ये नववर्ष साजरे होत असताना शनिवारी (दि. 31 डिसेंबर) मध्यरात्री महिलांचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात भाष्य करताना आझमी यांनी महिलांना दोष देत कमी कपडे घातल्यानेच अशी घटना घडल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी महिलांच्या वेशभूषेबाबत बोलताना म्हटले आहे की, "मी कधीही महिलांचा अवमान केलेला नाही. मात्र जे लोक महिलांना कमी कपडे परिधान करण्याची परवानगी देतात तेच लोक महिलांना अवमान करतात. जर मी महिलांनी योग्य वेशभूषा करण्याबाबत सांगितले तर मला पुराणमतवादी म्हणून संबोधले जाईल.' महिलांविरुद्ध होणारे गुन्हे रोखण्यासाठी महिलांनीच सावध राहून काळजी घेणे आवश्‍यक आहे, असा सल्लाही यावेळी आझमी यांनी दिला.

"जोपर्यंत या लोकांमध्ये (गुन्हेगार) सुधारणा होत नाहीत, तोपर्यंत देशात अशा घटना घडतच राहतील. तोपर्यंत मुलींनी स्वत:च्या सुरक्षेविषयी सावधानता बाळगून काळजी घेणे आवश्‍यक आहे.', असेही ते पुढे म्हणाले. बंगळूरबाबत घटनेनंतर आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगताना त्यांनी माध्यमांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "एखाद्या व्यक्तीला काय सांगायचे आहे ते सोडून टीआरपीसाठी माध्यमांकडून त्याच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो.'

Web Title: people allowing women to wear short clothes are the ones who actually disrespect them