तोकडे कपडे घालू देणे हा महिलांचा अनादर

पीटीआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

मी आतापर्यंत महिलांचा अनादर केलेला नाही. मात्र लोक मला सनातनवादी म्हणातात. महिलांनी योग्यप्रकारचे कपडे परिधान करावेत. कारण त्यांच्या सुरक्षेची काळजी त्यांनी घेणे गरजेचे असून, तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांना लगाम बसणार नाही.

नवी दिल्ली - बंगळूरमधील महिला छेडछाडप्रकरणी वादग्रस्त विधान करून रोष ओढवून घेतलेले समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी आज पुन्हा याविषयी आपले मत मांडले. महिलांना तोकडे कपडे परिधान करण्यास अनुमती देणे हा एकप्रकारे त्यांचा अनादर करण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या मागील विधानवर ठाम राहात ते म्हणाले, की मी आतापर्यंत महिलांचा अनादर केलेला नाही. मात्र लोक मला सनातनवादी म्हणातात. महिलांनी योग्यप्रकारचे कपडे परिधान करावेत. कारण त्यांच्या सुरक्षेची काळजी त्यांनी घेणे गरजेचे असून, तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांना लगाम बसणार नाही. तुम्ही तुमच्यात बदल करत नाही तोपर्यंत अशा व्यक्तींमध्ये सुधारणा होणार नाहीत. अशा घटना वारंवार घडत राहतील''

इस्लाममध्ये लिव्ह इन रिलेशन अस्वीकार्य आहे. महिलेचे लग्न झाल्यानंतरच तिने पुरुषासोबत राहावे. दुबई कुवेत सौदी अशा देशांत महिला फॅशनेबल कपडे वापरतात. मात्र त्या सुरक्षित आहेत. कारण तेथील कायदे कडक आहेत. निर्भया प्रकरणानंतर बलात्कार, विनयभंगाशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, मात्र ते आणखी कठोर व्हावेत, असे आपणास वाटते. असे आझमी यांनी स्पष्ट केले.
आझमींनी केलेल्या वक्तव्यावरून विविध महिला संघटनांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली असून, महिला आयोगाने याप्रकरणी त्यांना समन्सही बजावले आहे.

'त्या' विधानाचा विपर्यास
तोकडे कपडे घातल्याने महिलांना छेडछाडीस सामोरे जावे लागले, या मागे केलेल्या विधानाचा माध्यमांनी टीआरपीसाठी विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण आझमी यांनी दिले. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी आपली मागणी असून, भारतीय संस्कृतीसाठी आवाज उठविल्याबद्दल आपल्याला अनेकांनी पाठिंबा दर्शविल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: People allowing women to wear short clothes disrespect them