देशात 283 जणांकडे दोनशे कोटींपेक्षा अधिक संपत्ती

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये देशातील दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या 195 होती. मागील आर्थिक वर्षात ही संख्या 283 वर गेली.

नवी दिल्ली - देशातील दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या मागील आर्थिक वर्षात 195 वरून 283 वर गेली आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
ते म्हणाले की, आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये देशातील दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या 195 होती. मागील आर्थिक वर्षात ही संख्या 283 वर गेली. मागील काही वर्षात ही संख्या वाढत आहे. आर्थिक वर्ष 2013 -14 मध्ये दोनशे कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या 107 होती आणि 2014-15 मध्ये 134 वर गेली. व्यक्तिगत करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी जमा करण्यात आली आहे.

वस्तू व सेवा कराबद्दल (जीएसटी) बोलताना गंगवार म्हणाले की, 1 मार्च 2017 पर्यंत 48 लाख 48 हजार 641 करदात्यांनी जीएसटीसाठी नोंदणी केली आहे. जीएसटीमुळे करप्रणालीचा विस्तार होऊन कर संकलनात वाढ होईल. तसेच, पायभूत सुविधा क्षेत्राला गती मिळणार आहे.

Web Title: People with assets of over Rs 200 cr rises to 283