पेट्रोल-डिझेल तस्करी बिहारमध्ये वाढली

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

दारूबंदी झालेल्या बिहारमध्ये आता दारूबरोबरच पेट्रोल-डिझेलच्या तस्करीलाही जोर आला आहे. शेजारी असलेल्या उत्तर प्रदेश आणि झारखंडात इंधन स्वस्त असल्यामुळे ही तस्करी वाढली आहे. कोणत्याही कागदपत्रांविना या दोन राज्यांतून पेट्रोल-डिझेल आणून बिहारमध्ये विकले जाते. 
 

पाटणा - दारूबंदी झालेल्या बिहारमध्ये आता दारूबरोबरच पेट्रोल-डिझेलच्या तस्करीलाही जोर आला आहे. शेजारी असलेल्या उत्तर प्रदेश आणि झारखंडात इंधन स्वस्त असल्यामुळे ही तस्करी वाढली आहे. कोणत्याही कागदपत्रांविना या दोन राज्यांतून पेट्रोल-डिझेल आणून बिहारमध्ये विकले जाते. 

या तस्करीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीचेही नुकसान होत आहे. बिहारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी वाहनचालक शेजारच्या राज्यांमध्येच इंधन भरून घेत असल्यामुळे तिजोरीला आर्थिक फटका बसतो. उत्तर प्रदेशातील लखनौच्या तुलनेत पाटण्यात पेट्रोल 4.95 रुपये, तर डिझेल 4.74 रुपयांनी महाग आहे. झारखंडातील रांचीच्या तुलनेत पाटण्यात पेट्रोल 5.79 आणि डिझेल 1.07 रुपयांनी महाग आहे. बिहारमध्ये मुख्यत्वे झारखंडातून चोरट्या मार्गाने पेट्रोल येते. पलीकडे असलेल्या नेपाळमध्येही बिहारच्या तुलनेत इंधन स्वस्त आहे, त्यामुळे तेथूनही तस्करी होते. 

बिहारमध्ये पेट्रोल-डिझेलच्या मूळ किमतीवर पाच टक्के अधिभार आहे. शिवाय "व्हॅट'ही असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या मूळ किमतीत वाढ होते. राज्यात पेट्रोलवर 26, तर डिझेलवर 19 टक्के "व्हॅट' आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि झारखंडच्या तुलनेत बिहारमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात चार ते सहा रुपयांनी वाढ होते. बिहार पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सरचिटणीस बिजेंद्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार, तस्करीची आकडेवारी नसली, तर उत्तर प्रदेश, झारखंड आणि नेपाळमधून रोज साधारणतः 50 हजार लिटर पेट्रोल-डिझेल बिहारमध्ये तस्करीच्या मार्गाने येत असल्याचा अंदाज आहे. 

Web Title: Petrol and diesel smuggling increased in Bihar