पेट्रोल, डिझेलवरील करात मध्य प्रदेशकडूनही कपात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांनतर पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करणारे मध्य प्रदेश हे भाजपशासित तिसरे राज्य ठरले आहे. या निर्णयानंतर राज्यात पेट्रोल प्रतिलिटर 1.70 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 4 रुपयांनी स्वस्त झाले आहे

भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) प्रतिलिटर अनुक्रमे 3 व 5 टक्के कपात केली आहे. यासोबत डिझेलवरील अतिरिक्त उपकर प्रतिलिटर दीड रुपयाने कमी केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांनतर पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करणारे मध्य प्रदेश हे भाजपशासित तिसरे राज्य ठरले आहे. अर्थमंत्री जयंत मालवीय म्हणाले, की मध्य प्रदेश सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये प्रतिलिटर 3 टक्के कपात केली आहे. डिझेलवरील व्हॅटमध्ये प्रतिलिटर 5 टक्के कपात करण्यात आली असून, अतिरिक्त उपकर प्रतिलिटर दीड रुपयाने कमी केला आहे. आता पेट्रोलवरील व्हॅट 31 वरून 28 टक्के आणि डिझेलवरील व्हॅट 27 वरून 22 टक्‍क्‍यांवर आला आहे.

या निर्णयानंतर राज्यात पेट्रोल प्रतिलिटर 1.70 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 4 रुपयांनी स्वस्त झाले आहे. राज्य सरकारला या निर्णयामुळे चालू आर्थिक वर्षातील उरलेल्या सहा महिन्यांत एकूण एक हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petrol diesel madhya pradesh