मध्यरात्रीपासून पेट्रोल केवळ रोख रकमेवरच?

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

बॅंकांच्या या निर्णयावर तेल मंत्रालयामधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनीही आश्‍चर्य व्यक्त व्यक्त केले आहे. या प्रश्‍नी पेट्रोल पंप संघटना, सरकारी तेल कंपन्या आणि बॅंकांनी एकत्रितरित्या चर्चा करुन सामंजस्याने मार्ग निघेपर्यंत हे शुल्क आकारले जाऊ नये, असे आवाहन तेल मंत्रालयाकडून करण्यात आले आहे

नवी दिल्ली - पेट्रोल पंपवर पेट्रोल भरताना "कार्ड'चा वापर केल्यास 1 % आर्थिक शुल्क आकारण्याच्या काही बॅंकांच्या निर्णयास अखिल भारतीय पेट्रोल पंप मालक संघटनेने आज (रविवार) ठाम विरोध दर्शविला. याचबरोबर, हे शुल्क आकारले गेल्यास आज (रविवार) मध्यरात्रीपासून पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून कार्ड न स्वीकारता केवळ रोख रक्कमच स्वीकारु, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

दरम्यान, बॅंकांच्या या निर्णयावर तेल मंत्रालयामधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनीही आश्‍चर्य व्यक्त व्यक्त केले आहे. या प्रश्‍नी पेट्रोल पंप संघटना, सरकारी तेल कंपन्या आणि बॅंकांनी एकत्रितरित्या चर्चा करुन सामंजस्याने मार्ग निघेपर्यंत हे शुल्क आकारले जाऊ नये, असे आवाहन तेल मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. देशभरातील आर्थिक व्यवहार हे जास्तीत जास्त इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने व्हावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील असतानाच निर्माण झालेला हा अडथळा सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

आयसीआयसीआय, एचडीएएफसी आणि ऍक्‍सिस या बॅंकांनी काल (शनिवार) रात्री पेट्रोल मालक वितरकांना यासंदर्भातील नोटिस पाठविली आहे. या पार्श्‍वभूमीवर संतप्त संघटनेकडून कार्ड न स्वीकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. देशात सध्या एकूण 56,842 पेट्रोल पंप आहेत. याआधीच रोख रकमेच्या तुटवड्यामुळे झगडत असलेल्या देशातील सामान्य नागरिकांना बॅंक व पेट्रोल मालकांच्या संघटनेमध्ये निर्माण झालेल्या या आकस्मिक संघर्षाचा मोठा फटका बसण्याची भीती या पार्श्‍वभूमीवर निर्माण झाली आहे.

Web Title: Petrol pumps threaten to stop accepting cards from Midnight