तेल कंपन्यांबरोबर आज पेट्रोलियम मंत्र्यांची बैठक

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रमी दरवाढीने सर्वसामान्यांमध्ये उमटलेल्या नाराजीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उद्या (ता. 23) तेल कंपन्यांबरोबर तातडीची बैठक घेणार आहेत, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज सांगितले. पेट्रोल-डिझेलची दैनंदिन दरवाढ तीन-चार दिवसांत रोखण्याचे निर्देश उद्या दिले जाऊ शकतात अशी माहिती समजली. 

नवी दिल्ली - पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रमी दरवाढीने सर्वसामान्यांमध्ये उमटलेल्या नाराजीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उद्या (ता. 23) तेल कंपन्यांबरोबर तातडीची बैठक घेणार आहेत, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज सांगितले. पेट्रोल-डिझेलची दैनंदिन दरवाढ तीन-चार दिवसांत रोखण्याचे निर्देश उद्या दिले जाऊ शकतात अशी माहिती समजली. 

पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या पाच दिवसांत तब्बल नऊ रुपयांची वाढ झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सरकारपर्यंत ही नाराजीची भावना पोहोचली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड तेलाच्या दरवाढीने सरकारसमोर विचित्र संकट उभे राहिले आहे. आगामी तीन-चार दिवसांत या समस्येवर सकारात्मक उपाययोजना करू, असे शहा यांनी सांगितले. पेट्रोल-डिझेलपाठोपाठ महागाईचाही भडका उडाला आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने उद्याच तीनही प्रमुख सरकारी पेट्रोलियम कंपन्यांची बैठक बोलावली आहे. तीत दरवाढीचा आढावा घेऊन पुढील दिशा निश्‍चित केली जाईल. पेट्रोल-डिझेल रोजच्या रोज व इतक्‍या मोठ्या प्रमाणावर महाग करू नका, लक्षात येणार नाही अशा सावकाश पद्धतीने करा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मूळ सूचना होती. मात्र, पेट्रोलियम कंपन्यांनी निवडणुका संपताच जो हापापलेपणा दाखविला त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात नाराजी असल्याचेही सांगण्यात येते. आगामी तीन ते चार दिवसांत दरवाढीबाबतच्या संकटाचे निराकरण करण्याचे प्रयत्न होतील असे शहा म्हणाले.

 

Web Title: Petroleum ministers meeting today with oil companies