रशियन महिलांकडून गयेत पिंडदानाचा विधी

उज्ज्वलकुमार
Thursday, 19 September 2019

पितृपक्षात पिंडदान करणे ही भारतीय संस्कृती. पण, आता परदेशी नागरिकही त्यात सहभागी होऊ लागले आहेत. गया शहरात रशियातील दोन महिलांनी त्यांच्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान केल्यावर तेथे असलेल्या भाविकांना थोडा धक्काच बसला.

पाटणा - पितृपक्षात पिंडदान करणे ही भारतीय संस्कृती. पण, आता परदेशी नागरिकही त्यात सहभागी होऊ लागले आहेत. गया शहरात रशियातील दोन महिलांनी त्यांच्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान केल्यावर तेथे असलेल्या भाविकांना थोडा धक्काच बसला.

जुलिया कुदारिन आणि इसलामोवा वेनिरा, अशी दोन महिलांची नावे आहेत. पाटण्यापासून गया फक्त 90 किलोमीटर अंतरावर आहे.

पिंडदानाविषयी मी इंटरनेटवर माहिती वाचली होती. त्यातून मी हा निर्णय केला, असे जुलिया कुदारिन यांनी सांगितले. अर्थात, त्यासाठी त्यांनी दुभाषाची मदत घेतली. प्रत्येक संस्कृतीत पूर्वजांचे स्मरण केले जाते. पण, पिंडदान ही वेगळी बाब वाटल्यामुळे मी पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी येथे आले, असे इसलामोवा वेनिरा यांनी सांगितले.
गया शहरातून फल्गू नदी वाहते. प्राचीन काळी ही नदी शहराबाहेर होती.

पण, शहराचा विस्तार होत गेल्यावर ती शहराच्या मध्यभागी आली आहे. पितृपक्षातील पिंडदानासाठी भाविक या नदीवर येतात. यंदा किमान आठ लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. उत्तर आणि दक्षिण भारतासह पूर्व आणि पश्‍चिम भारतातील भाविकांचा ओघ सध्या वाढला आहे. गयामध्ये 365 पिंडवेदी आणि सरोवरे होती, असे सांगतात. तेथेच पिंडदान केले जात असे. आता केवळ 65 वेदी उरल्या आहेत. तेथेच पितृपक्षाचे विधी केले जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pinddan Vidhi ni Gaya city by Rasian Women