चलनात लवकरच प्लॅस्टिक नोटा

पीटीआय
शनिवार, 10 डिसेंबर 2016

सरकारची संसदेत माहिती; साहित्याची खरेदी प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली - प्लॅस्टिकच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, यासाठी साहित्याची खरेदी सुरू झालेली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत दिली.

सरकारची संसदेत माहिती; साहित्याची खरेदी प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली - प्लॅस्टिकच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, यासाठी साहित्याची खरेदी सुरू झालेली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत दिली.

रिझर्व्ह बॅंकेचा प्लॅस्टिक नोटा छापण्याचा प्रस्ताव आहे का, या विषयावर लोकसभेत प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावर दिलेल्या लेखी उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, की प्लॅस्टिकच्या नोटा छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीच्या साहित्याची खरेदी प्रक्रियाही सुरू झालेली आहे.'' प्रायोगिक तत्त्वावर प्लॅस्टिक नोटांचा प्रयोग यशस्वी झाल्याने रिझर्व्ह बॅंकेने सर्वच ठिकाणी प्लॅस्टिक नोटा चलनात आणण्याचे नियोजन केले आहे. सरकारने फेब्रुवारी 2014 मध्ये याबाबत माहिती दिली होती, की कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्‍वर या भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या असलेल्या शहरांत प्रायोगिक तत्त्वावर दहा रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. प्लॅस्टिक नोटांचे आयुष्य पाच वर्षांचे असते आणि त्यांची बनावट करणे अवघड आहे. तसेच प्लॅस्टिकपासून बनविलेले चलन कागदापेक्षा स्वच्छ राहते. बनावट नोटांना आळा घालण्यासाठी प्रथम ऑस्ट्रेलियात प्लॅस्टिक नोटा चलनात आल्या.

दुसऱ्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात मेघवाल यांनी माहिती दिली, की सुरक्षा धागा नसलेल्या एक हजार रुपयांच्या नोटा मिळाल्याचे रिझर्व्ह बॅंकेने डिसेंबर 2015 मध्ये सरकारला कळविले होते. या नोटांची छपाई नाशिकमधील चलार्थ मुद्रणालयात झाली होती आणि या कागदाचा पुरवठा होशंगाबाद येथील सिक्‍युरिटी पेपर मिलने केला होता. या प्रकरणी दोन्ही संस्थांची चौकशी करण्यात येत आहे.

प्लॅस्टिक नोटांच्या दिशेने...
- देशातील पाच शहरांत चाचणी
- सरासरी आयुष्य पाच वर्षे
- बनावट करण्यास अवघड
- कागदापेक्षा स्वच्छ राहणार
- सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात वापर

Web Title: Plastic currency comming soon