कचरा जाळल्यास ‘पीएम किसान’ रोखणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

कचरा जाळल्यास ‘पीएम किसान’ रोखणार

लखनौ : शेतात काडीकचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याने राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशातील अनेक भागात प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे काडीकचरा जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर आता उत्तर प्रदेशात कडक कारवाई केली जात असून पहिल्यांदा कचरा जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर दंड आकारला जाणार नाही. मात्र एखादा शेतकरी पुन्हा चूक करत असेल तर त्याला मिळणारे सरकारी अनुदान आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी रोखण्यात येणार आहे.

पीक कापणी झाल्यानंतर शेतकरी शेतातच कचरा जाळतात. शेतकऱ्यांच्या मते, कचऱ्याचे योग्यरित्या व्यवस्थापन होत नसल्याने आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जात नसल्याने त्यांना नाईलाजाने कचरा जाळावा लागत आहे. यावर्षी पंजाबमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. तर हरियाना आणि उत्तर प्रदेशात प्रमाण घटले आहे.

उत्तर प्रदेशने अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. एखादा शेतकरी पकडला आणि एक हेक्टरपर्यंत पीक जाळताना आढळून आला तर अडीच हजार रुपये तर २ ते ५ हेक्टरवर पिकाचा कचरा जाळल्यास पाच हजार दंडाची तरतूद केली आहे. पाच हेक्टरपेक्षा अधिक कचरा जाळल्यानंतर पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक दंड आकारला जाणार आहे.

उपग्रहाद्वारे छायाचित्रण

उत्तर प्रदेशात कचरा जाळण्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याने प्रशासनाकडून उपग्रहाची मदत घेतली जात आहे. कचरा जाळणाऱ्यांवर उपग्रहाद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. योगी सरकारने याबाबत कडक भूमिका घेतली आहे. उत्तर प्रदेशात कचरा जाळण्याच्या घटनेत घट झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत कचरा जाळण्याचे प्रमाण ३५ टक्क्यांनी घटले आहे.