​Bihar Election : 'नवा रेकॉर्ड बनवा'; बिहारच्या जनतेला PM मोदींचं आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

निवडणुकीच्या या तिसऱ्या टप्प्यात बिहारमधील 16 जिल्ह्यांमधील 78 जागांसाठी मतदान होत आहे.

पाटना : बिहार विधानसभा निवडणुकीचा आता शेवटचा भाग सुरु आहे. तीन टप्प्यात या निवडणुका पार पडत आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान हे 28 ऑक्टोबर रोजी पार पडले तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे तीन नोव्हेंबर रोजी पार पडले. तर आज सात नोव्हेंबर तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 10 तारखेला लागणार आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांचे भवितव्य पणाला लागणार आहे. कारण या निवडणुकीत उलथापालथ घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन मतदारांना आवाहन केलं आहे. 

हेही वाचा - Corona Update : शुक्रवारी नवे 50,314 रुग्ण; एकूण मृतांचा आकडा 1.25 लाखांच्या पार

त्यांनी म्हटलंय की, बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये आज तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आहे. सर्व मतदारांना माझी विनंती आहे की त्यांनी अधिकाधिक संख्येने लोकशाहीच्या या पवित्र पर्वात सहभागी व्हावं तसेच त्यांनी मतदानाचा नवा उच्चांक बनवावा. आणि हो, मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचेदेखील पालन करा. कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. प्रशासनाने अनेक नियम लागू करुन ही निवडणुकीची प्रक्रीया पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच मोदींनी आपल्या ट्विटमध्ये मतदारांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केलं आहे. 

निवडणुकीच्या या तिसऱ्या टप्प्यात बिहारमधील 16 जिल्ह्यांमधील 78 जागांसाठी मतदान होत आहे. ही निवडणूक अनेक अंगांनी महत्त्वाची मानली जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राजदच्या तेजस्वी यादव यांनी तगडे आव्हान दिले आहे तसेच चिराग पासवान यांच्या लोजपाने देखील एनडीएशी फारकत घेत नितीश कुमारांविरोधातच दंड थोपटले आहे. नितीश कुमारांना तरुण नेतृत्वाने तर घेरले आहेच सोबतच बसपा-एमआयएम ही तिसरी आघाडीदेखील मैदानात आहे. आपल्या शेवटच्या सभेत मतदारांना आवाहन करताना नितीश कुमारांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याने मतदान करा असं सांगितलं होतं. त्यामुळे, या निवडणुकीनंतरचे चित्र बरेच अनपेक्षित असल्यांचं बोललं जात आहे. 

हेही वाचा - अमित शहा यांनी चुकीच्या प्रतिमेस पुष्पहार घातल्याने नवा वाद निर्माण

या निवडणुकीत मोदी यांनी जवळपास 12 सभांना संबोधित केलं. त्यांनी बिहारच्या विकासासाठी नितीश कुमार यांनाच मत देण्याचे आवाहन केलं आहे. मात्र, तेजस्वी यादव यांच्या सभेला होणारी गर्दी ही चिंतेची बाब मानली जात होती. आता अंतिम टप्प्यातील मतदानानंतर निकालातच  ही बाब स्पष्ट होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi appealed bihar people to set new record by voring