दवाखाने, पेट्रोलपंपावर 24 नोव्हेंबरपर्यंत चालणार जुन्या नोटा

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नोटा स्वीकारण्याचा आज(ता.14) शेवटचा दिवस होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री उशिरा अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत सरकारी दवाखाने, पेट्रोलपंप, दूधकेंद्र यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढविली आहे. आता येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. 

नोटा स्वीकारण्याचा आज(ता.14) शेवटचा दिवस होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री उशिरा अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. टोलनाक्यावरील वसुलीसंदर्भातील निर्णय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून घेण्यात येईल. आज मध्यरात्रीपर्यंत टोलनाक्यांवरील वसुली बंद ठेवण्यात आली आहे. 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून रक्कम काढण्यावर लावण्यात आलेले निर्बंधदेखील काही प्रमाणात मागे घेण्यात आले आहेत. आता नागरिक एका दिवसात चार हजार रुपयांऐवजी साडेचार हजार रुपये रक्कम बदलून घेऊ शकणार आहेत. त्याचप्रमाणे, एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा पाचशे रुपयांनी वाढवत अडीच हजार रुपयेएवढी करण्यात आली आहे. 

निवृत्तीवेतनधारकांना वार्षिक प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली असून, बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यास गेलेले जेष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी वेगळी रांग असेल असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. लवकरच एटीएममधून पाचशे व दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

Web Title: PM Modi chairs meeting with senior Cabinet Ministers; Rs 500, Rs 1000 notes accepted till Nov 24