माझी बेहिशेबी मालमत्ता दाखवावी : मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

गेल्या पाच वर्षांच्या काळात कोणत्याही प्रकारची बेहिशेबी मालमत्ता जमविली असेल किंवा परकी बॅंकेत पैसा जमा केले असेल, तर विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.

बलिया : गेल्या पाच वर्षांच्या काळात कोणत्याही प्रकारची बेहिशेबी मालमत्ता जमविली असेल किंवा परकी बॅंकेत पैसा जमा केले असेल, तर विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले, जर तुमच्यात खरोखरच दम असेल तर मला नाव ठेवण्यापेक्षा महामिलावट आघाडी करणाऱ्या नेत्यांनी माझे आव्हान स्वीकारावे. मी जर फार्महाउस बांधले असेल, बंगला किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्‍स उभारले असेल, एखाद्या परकी बॅंकेत मुदत ठेव ठेवली असेल, परदेशात एखादी मालमत्ता खरेदी केली असेल किंवा कोट्यवधीच्या, लाखांच्या गाड्या खरेदी केल्या असतील तर ते सिद्ध करून दाखवावे.

मी श्रीमंत बनण्याचे स्वप्न पाहणारा व्यक्ती नाही आणि कोणाचाही पैसा लुटला नाही. गरिबांचे कल्याण करण्यासाठी आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. देशाचा सन्मान राखणे आणि संरक्षण करणे, हेच आपले कायम ध्येय राहिले आहे. या कारणामुळेच पाकिस्तानातील दहशतवाद्याची पाळेमुळे नष्ट होत आहेत. पाकिस्तानात आश्रय घेणारे दहशतवादी आज जमिनीखाली दडून बसले आहेत आणि मोदींना सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कधी जंगलात, कधी आकाशात तर कधी समुद्रात लपत आहेत. या वेळी बालाकोट कारवाईसंदर्भात प्रश्‍न उपस्थित करणाऱ्या सप-बस या आघाडीवर आणि कॉंग्रेसवर त्यांनी टीका केली.

सर्जिकल स्ट्राइकसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, आपल्या आशीर्वादाने देशाच्या सुपुत्रांना मोकळीक दिली आहे. त्यामुळेच अगोदर सर्जिकल स्ट्राइक झाले आणि नंतर एअर स्ट्राइक. आज दहशतवादाविरोधातील लढाई ही सीमेपार गेली आहे. मात्र, विरोधक जवानांच्या साहसाबद्दल प्रश्‍न उपस्थित करतात आणि पाकिस्तानच्या "नापाक' पुराव्यावर विश्‍वास ठेवतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi challenges Opposition to prove if he has amassed assets