नितीशकुमारांच्या दारूबंदीच्या निर्णयाचे मोदींकडून कौतुक

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पाटना (बिहार) : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे दारूबंदीचे अभियान इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) या निर्णयाबद्दल नितीशकुमार यांचे कौतुक केले आहे.

पाटना (बिहार) : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे दारूबंदीचे अभियान इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) या निर्णयाबद्दल नितीशकुमार यांचे कौतुक केले आहे.

पाटना येथील गांधी मैदान येथे आयोजित प्रकाश पर्व कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी गुरु गोविंद सिंह यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त नितीशकुमार यांनी बिहारमध्ये आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले. देशाच्या विकासात बिहारचे मोठे योगदान असल्याचे सांगत मोदी म्हणाले, 'नितीशकुमार यांच्या दारूबंदीच्या अभियानाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या अभियानामुळे येणाऱ्या पिढ्यांचे रक्षण होणार असून हे अभियान इतर राज्यांकरिता प्रेरणादायी ठरणार आहे. या अभियानासाठी नितीशकुमार यांना सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मी करतो. केवळ सरकारमुळे किंवा नितीशकुमार यांच्यामुळे दारूबंदीचे अभियान यशस्वी होणे शक्‍य नाही. तर, यामध्ये समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांचा सहभाग आवश्‍यक आहे.'

नितीशकुमार यांनी यावेळी बोलताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या दारूबंदीच्या निर्णयाचा उल्लेख केला. "बारा वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री असलेले सध्याचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये दारूबंदीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली', असा उल्लेख नितीशकुमार यांनी यावेळी केला. यापूर्वीही मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला नितीशकुमार यांनी पाठिंबा दर्शविला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi congratulates Nitish for his 'nasha-mukti-abhiyan'