पूरग्रस्त गुजरातसाठी पाचशे कोटींची मदत; पंतप्रधान मोदींनी केली हवाई पाहणी

यूएनआय
बुधवार, 26 जुलै 2017

केंद्र सरकारकडून राज्याला पाचशे कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर करतानाच त्यांनी पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना पन्नास हजार रुपयांची नुकसानभरपाईही जाहीर केली.

नवी दिल्ली : नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी कार्यक्रम आटोपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातकडे धाव घेत पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. तसेच मोदी यांनी तातडीने पाचशे कोटी रुपयांचा मदतनिधीही जाहीर केला.

मॉन्सूनच्या मुसळधार पावसानंतर गुजरातला पुराचा फटका बसला आहे. राज्यातील बनासकांठा आणि पाटण या जिल्ह्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, अद्यापही जिल्ह्यातील अनेक गावे पुराने वेढली गेली आहेत. दिल्लीहून येथे येताच मोदींनी विमानतळावरच सुमारे तासभर मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हे उपस्थित होते. या वेळी मोदी यांना पुराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर मोदींनी संबंधितांना विविध सूचना केल्या.

पूरग्रस्त भागांमध्ये मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाची आणखी दहा हेलिकॉप्टर पाठविणार असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले. केंद्र सरकारकडून राज्याला पाचशे कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर करतानाच त्यांनी पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना पन्नास हजार रुपयांची नुकसानभरपाईही जाहीर केली. या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आश्‍वासन मोदींनी दिले. पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तातडीने पथके पाठविली जाणार आहेत. पूरग्रस्त भागांमध्ये लष्कर, भारतीय हवाई दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन बचाव पथकाचे जवान येथे नागरिकांना मदत करत आहेत.

गेल्या चोवीस तासांमध्ये बनासकांठा, पाटण आणि सबरकांठा या जिल्ह्यांमधील बारा तालुक्‍यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. बचाव पथकांनी पूरग्रस्त भागांमधून एक हजार नागरिकांची सुटका केली असून, 46 हजार जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

 

    Web Title: PM Modi declares 500 crore help flood affected gujarat