आसाम अरुणाचलला जोडणाऱ्या पुलास भूपेन हझारिकांचे नाव: मोदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

2004 मध्ये अटलजींचे सरकार पुन्हा निवडून आले असते; तर हा पूल 10 वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाला असता. आमच्या तत्कालीन खासदारांनी हा पूल बांधण्याची विनंती केली होती व अटलजींच्या सरकारने या पुलाच्या रचनेचा अभ्यास करण्याचे आदेशही दिले होते. मात्र यानंतर सरकार बदलले व तुमचे स्वप्न लांबणीवर पडले

गुवाहाटी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) आसाम राज्यामधील तिनसुखिया जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्‌घाटन केले. हा पूल भारतामधील सर्वांत लांब पूल आहे. प्रसिद्ध गायक-संगीतकार व "ब्रह्मपुत्रेचे पुत्र' असलेल्या भूपेन हझारिका यांचे नाव या पुलास ठेवण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी सभेत बोलताना केली.

शाश्‍वत विकासासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याची आवश्‍यकताही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली.

पंतप्रधान म्हणाले -

# गेल्या पाच दशकांपासून तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत होता; तो पूल आता प्रत्यक्षात आला आहे.

# श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीवर येणे मी परम भाग्याचे समजतो.

# 2004 मध्ये अटलजींचे सरकार पुन्हा निवडून आले असते; तर हा पूल 10 वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाला असता. आमच्या तत्कालीन खासदारांनी हा पूल बांधण्याची विनंती केली होती व अटलजींच्या सरकारने या पुलाच्या रचनेचा अभ्यास करण्याचे आदेशही दिले होते. मात्र यानंतर सरकार बदलले व तुमचे स्वप्न लांबणीवर पडले. 

#आज आसाम राज्यामध्ये भाजपशासित सरकार एक वर्ष पूर्ण करत आहे. आम्ही आसाममधील समस्यांवर कालबद्ध उपाययोजना करत आहोत.

# केवळ आसामच नव्हे; तर संपूर्ण भारतासाठी हा पूल एक आभिमानास्पद बाब. 
या पुलामुळे आसाम व अरुणाचल प्रदेश ही राजे अधिक जवळ येतील. आर्थिक समृद्धीच्या नव्या वाटा उपलब्ध होतील. वेळेच्या बचतीसहच या पुलामुळे दिवसाला 10 लाख रुपयांची इंधनबचत होईल. 

# आम्ही हा भाग आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या पुलाच्या माध्यमामधून भारतास दक्षिण पूर्व आशियासही जोडण्यात येईल

Web Title: PM Modi gifts northeast the 'Bhupen Hazarika Bridge'