'पंतप्रधान मोदी हिटलर तर राहुल गांधी मुसोलिनी'

'पंतप्रधान मोदी हिटलर तर राहुल गांधी मुसोलिनी'

नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीचे भयाण वास्तव मांडणारा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा (एनएसएसओ) अहवाल उघड झाल्यानंतर आज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना केवळ मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या हिटलरशी (फ्यूरर) केली, तर भाजपने राहुल यांना इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीची उपाधी दिली आहे. राहुल यांना संकुचित दृष्टिकोन वारशानेच मिळाला असल्याचा टोलाही भाजपकडून लगावण्यात आला. 

सध्या दिल्लीमध्ये केंद्र सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प मांडण्याची लगीनघाई सुरू असतानाच एका इंग्रजी दैनिकाने "एनएसएसओ'चा अहवाल फोडून देशातील बेरोजगारीचे भयाण वास्तव उघड केले. बेरोजगारीच्या दराने मागील 45 वर्षांतील उच्चांक गाठल्याचा दावा यात करण्यात आला आहे. याच मुद्यावरून आक्रमक भूमिका घेत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सरकारला धारेवर धरले. मोदींनी दरवर्षी दोन कोटी नवे रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते; पण पाच वर्षांनंतर आता उघड झालेल्या रोजगार निर्मिती अहवालातून केवळ राष्ट्रीय अराजकताच दिसून येते, असे ट्‌विटास्त्र त्यांनी सोडले. या वेळी राहुल यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरला संबोधून वापरण्यात येणारी "फ्यूरर' ही उपाधी मोदींनाही दिली. याला भाजपनेही प्रत्युत्तर दिले. राहुल यांचे या संदर्भातील आकलन हे लघूदृष्टीचे आहे. ज्या व्यक्तीने कधी योग्य नोकरी केलीच नाही तीच व्यक्ती अशा खोट्या बातम्यांचा प्रचार करू शकते, अशी टीका भाजपकडून करण्यात आली.

फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये राहुल यांनी म्हटले आहे की, ""सत्य लपविता येत नाही किंवा दफनही करता येत नाही, ते बिजाप्रमाणेच असते. दफन करू पाहणाऱ्याला त्याचा चेहरा आरशामध्ये दाखविण्यासाठी ते फारसा विलंब लावत नाही. मोदींनी तरुणांचा विश्‍वासघात केला आणि आज हे सत्य सर्वांसमोर आले आहे.'' कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि अभिषेक मनू सिंघवी यांनीही याच मुद्यावरून सरकारला लक्ष्य केले. 

सोशल मीडियावर भाजप लक्ष्य 

बेरोजगारीचा मुद्यावरून आज नेटीझन्सनी सोशल मीडियावर भाजप सरकारची चांगली धुलाई केली. आज ट्विटरवर #HowstheJobs 
हा ट्रेंड विशेष चर्चेत होता. राहुल यांच्या ट्विटनंतर अक्षरश: प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरवात झाली. भाजपनेही बाजी पलटत असल्याचे लक्षात येताच राहुल यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले.

मुसोलिनींचा अदूरदर्शीपणा त्यांना वारश्‍याने मिळाला, हे स्पष्टच आहे. या विषयाबाबतचे राहुल यांचे आकलन असेच आहे. "ईपीएफओ'ने खरी आकडेवारी प्रसिद्ध केली असून, यात रोजगाराच्या संधी वाढल्याचे दिसत आहे. हे सगळे मागील पंधरा महिन्यांमध्ये झाल्याचे भाजपने म्हटले आहे. 

नमो जॉब्स 
या नेत्याने दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते, आता पाच वर्षांनंतर त्याच्या रोजगार निर्मितीचा अहवाल उघड झाला असून, यातून राष्ट्रीय अराजक दिसून येते. बेरोजगारीच्या दराने मागील 45 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. 2017- 18 या एका वर्षात 6.5 कोटी तरुणांनी रोजगार गमावला आहे. 

- राहुल गांधी, अध्यक्ष कॉंग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com