तात्या टोपेंच्या स्मारकाच्या उद्घाटनाला येणार पंतप्रधान मोदी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

येवला - ''सेनापती तात्या टोपेंच्या राष्ट्रीय स्मारकाची इमारत उत्तम दर्जाची व्हायला हवी, याबाबत काही अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करा. मी उदघाटनाला येवल्यात येईन'', अशी जिव्हाळ्याने विचारपूस करत आणि येवल्याचा फेटा परिधान करून घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील पदाधिकार्याशी चर्चा केली.

येवला - ''सेनापती तात्या टोपेंच्या राष्ट्रीय स्मारकाची इमारत उत्तम दर्जाची व्हायला हवी, याबाबत काही अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करा. मी उदघाटनाला येवल्यात येईन'', अशी जिव्हाळ्याने विचारपूस करत आणि येवल्याचा फेटा परिधान करून घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील पदाधिकार्याशी चर्चा केली.

भूमिपुत्र सेनापती तात्या टोपे यांच्या राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे १०.५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून जन्मभूमीत भव्य स्मारक साकारले जाणार असून, यामुळे इतिहासाला उजाळा मिळणार आहे. या योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे येवलेरांच्या वतीने आभार मानण्यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय स्मारक नवनिर्माण समितीने खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून व भाजपाचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याने मंगळवारी दुपारी पंतप्रधान कार्यालयात मोदी यांची भेट घेतली.

यावेळी खासदार चव्हाण, समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे, समितीचे सदस्य माजी नगराध्यक्ष भोलेनाथ लोणारी, संजय कुक्कर, धिरज परदेशी, बडाअण्णा शिंदे, संजय सोमासे, मयुर मेघराज, खासदार चव्हाण यांचे स्विय्य सहाय्यक डॉ.संदिप पवार, नाशिकच्या मानवाता क्यूरी हॉस्पिटलचे डॉ.राज नगरकर उपस्थित होते. 

प्रारंभी मोदींनी स्मारकाच्या कामाची वाटचाल, स्वरुप आणि येत असलेल्या अडचणी समिती सदस्यांकडून जाणून घेतल्या. स्मारक इमारत ही चिरकलीन आठवण राहणार आहे. ही वास्तू उत्कृष्ट दर्जाची झाली पाहीजे असे मोदींनी म्हटले. यावेळी खासदार चव्हाण यांना मोदींनी स्मारकाच्या कामाकडे लक्ष देण्याचे सांगत, त्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे व्यस्त नियोजनातून त्यांनी येवलेकरांना वेळ दिला. मोदींच्या भेटीमुळे आता या स्मारकाच्या कामाला चालना मिळणार असून, येणारे अडथळेही दूर होण्याचा आशावाद समिती सदस्यांनी व्यक्त केला. स्मारकासाठी निधी यापूर्वीच पालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जागा निश्चिती, प्रशासकीय मान्यता या शासकीय प्रक्रियेत याचे कामकाज अडकले आहे.

मोदींनी फेट्याचा आदराने केला सन्मान
येवल्याच्या फेट्याची महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. त्यामुळे आनंद शिंदे यांनी येथील फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांना मोदींना फेटा बांधण्यासाठी आठवणीने सोबत नेले होते. पंतप्रधान कार्यालयात खंदारे यांनी खास येवला शैलीचा दर्जेदार फेटा पंतप्रधान मोदी यांना बांधला. मोदींनी आदराने या फेट्याचा सन्मान केलाच पण जेव्हा कार्यालयाबाहेर समिती सदस्यासोबत फोटो काढण्यासाठी आले तेव्हा पुन्हा आदराने हा फेटा परिधान करून मोदींनी फोटो काढला..

तात्या टोपेंच्या जन्म स्थळाला देखील झळाळी देऊ ..
यावेळी समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे यांनी येवल्यातील तात्या टोपे यांच्या जन्मस्थळाची जागा अविकसित असल्याचे सांगितले. ही जागा येवलेकरांसाठी अस्मितेची असल्याने येथे देखील सुधारणा करावी अशी अपेक्षा मोदींकडे व्यक्त केली. यावर मोदींनी स्मारक झाले की जन्म स्थळाच्या जागेचा विकास करू, असे आश्वासन दिले.

Web Title: PM Modi to inaugurate Tatya Topn's memorial?