‘जेवार’मुळे यूपीच्या विकासाला बूस्टर; मोदींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

naredra modi
‘जेवार’मुळे यूपीच्या विकासाला बूस्टर; मोदींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन

‘जेवार’मुळे यूपीच्या विकासाला बूस्टर

नोएडा : स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशला सतत टोमणे मारले जात होते. कधी गरीब राज्य म्हणून तर कधी गैरव्यवहारावरून. खराब रस्ते तर कधी माफियावरून उत्तर प्रदेशला दोष दिला जायचा. आता उत्तर प्रदेशची प्रतिमा बदलत आहे. जेवार विमानतळामुळे यूपीच्या विकासाला बूस्टर डोस मिळाला आहे. उत्तर प्रदेशचे नाव आता सातासमुद्रापार जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील गौतम बौद्धनगर येथे जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन आज मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मोदी यांनी जेवार विमानतळामुळे उत्तर प्रदेशातील दळणवळण व्यवस्था आणखी सुलभ होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. या माध्यमातून उत्तर प्रदेश थेट आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडले जाईल. शेतकरी फळ, भाजीपाला, मासे निर्यात करू शकेल. मेरठचा क्रीडा उद्योग आणि आग्राचा पेठा हा परदेशात लवकर पोचेल. पूर्वी राजकीय लाभासाठी स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या केवळ घोषणा केल्या जात होत्या.परंतु ते प्रकल्प जमिनीवर कसे आणता येतील, याचा विचार केला जात नसे. अनेक दशकांपासून प्रकल्प रेंगाळत पडले होते. विलंबाचे खापर दुसऱ्यांवर फोडले जात होते. परंतु आता उत्तर प्रदेशचे चित्र बदलेल, असे मोदी म्हणाले.

नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, की जेवारच्या लोकांच्या डोळ्यात चमक मला दिसत आहे. ही चमक स्वप्नपूर्तीची आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ तयार करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न होते आणि ते लवकरच पूर्ण हेत आहे. या मातीत ३० ते ३५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. हे विमानतळ दिल्ली विमानतळापेक्षा मोठे असेल. जेवारचा रस्ता रेल्वे आणि मेट्रोने देखील जोडला जाईल. विमानतळामुळे नोएडा, गाझियाबादच्या परिसराचा विकास होईल, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले ...

  • ‘डबल इंजिन’च्या सरकारमुळे उत्तर प्रदेशचा वेगाने विकास

  • देशाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न, परंतु विकासाचा मार्ग सोडला नाही

  • देशाचा विकास ही आमची जबाबदारी

  • पूर्वीच्या सरकारकडून उत्तर प्रदेशच्या विकासाकडे दुर्लक्ष

  • जातीपातीच्या नावावर, भ्रष्टाचार, माफियावरून उत्तर प्रदेशला टोमणे

  • उत्तर प्रदेश आता गुंतवणूकदारांची पहिली पसंती

  • विमानतळ विकासामुळे पर्यटनाला चालना

साठ शेतकरी ताब्यात

मोदी हे भूमिपूजनाला येण्यापूर्वी नोएडा प्राधिकारणाविरोधात १ सप्टेंबरपासून आंदोलन करणाऱ्या ६० शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना गाझियाबाद पोलिस लाइनमध्ये ठेवण्यात आले. आज त्यांनी पंतप्रधानांना निवेदन देण्याची घोषणा केली होती.

"हा एकविसाव्या शतकातील भारत आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे तयार होणार आहे. विमानतळामुळे शेकडो युवकांना रोजगार मिळेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या क्षेत्रातील विकासाला गती मिळेल."

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

loading image
go to top