मोदींच्या पर्सनल वेबसाइटचं ट्विटरवर सायबर हल्ला; हॅकरने केले होते दोन ट्विट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक संकेतस्थळावर बुधवारी सायबर हल्ला झाला. हॅकर्सनी त्यांच्या संकेतस्थळाचे ट्विटर अकाउंट हॅक केलं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक संकेतस्थळावर बुधवारी सायबर हल्ला झाला. हॅकर्सनी त्यांच्या संकेतस्थळाचे ट्विटर अकाउंट हॅक केलं. त्यानंतर कोविड 19 रिलिफ फंडासाठी डोनेशन म्हणून थेट बिटकॉइनची मागणी केल्याचं समोर आलं. मात्र काहीच वेळात ही ट्विट डिलिट करण्यात आली. मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटच्या ट्विटर अकाउंटवर एक मेसेज लिहिण्यात आला होता. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, कोविड 19 साठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलिफ फंडासाठी दान करा. 

एका पाठोपाठ काही ट्विट करण्यात आली होती. त्यापैकी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटलं होतं की, हे अकाउंट जॉन विक (hckindia@tutanota.com) ने हॅक केलं आहे. आम्ही पेटीएम मॉल हॅक केलेला नाही असंही त्यात लिहिलं होतं. ही दोन्ही ट्विट डिलिट करण्यात आली आहेत. 

Image

पंतप्रधान मोदींच्या पर्सनल वेबसाइटच्या ट्विटर अकाउंटचे 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ट्विटरनेसुद्धा गुरुवारी याबाबत माहिती दिली असून ट्विटर हॅक झाल्याचं स्पष्ट केलं. मोदींच्या वेबसाइटचं अकाउंट सुरक्षित करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे. तसंच या प्रकाराची चौकशी केली जात असून इतर कोणती खाती हॅक केल्याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही.

हे वाचा - फक्त दहा रुपयात 'मोदी इडली'; अम्मा इडलीला देणार टक्कर

यापूर्वी पेटीएम मॉल डेटा चोरी प्रकरणात जॉन विक ग्रुपचे नाव समोर आले होते. सायबर सिक्युरिटी फर्म सायबलने 30 ऑगस्टला दावा केला होता की जॉन विक ग्रुपने पेटीएम मॉलचा डेटा चोरी केला आहे. दुसरीकडे पेटीएमनेसुद्धा असा काही डेटा हॅक झाला नव्हता असं सांगितलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi personal website twitter account hacked