मोदींकडून निर्णयांची उजळणी

मोदींकडून निर्णयांची उजळणी

नवी दिल्ली : नकारात्मकता पसरविणे सोपे असते; परंतु दृढ संकल्प आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सर्व अडथळे दूर होतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांच्या यशोगाथांचा आज "मन की बात'मधून गौरव केला. तसेच, मावळत्या वर्षात सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांनाही उजाळा देत नव्या वर्षातही प्रगती आणि उन्नतीचा हा प्रवास सुरूच राहील असा विश्‍वास व्यक्त केला. 
"मन की बात' या नभोवाणीवरील कार्यक्रमाच्या 51 व्या आणि यावर्षातील अखेरच्या भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधताना नववर्षाच्या शुभेच्छा देत मावळत्या वर्षातील महत्त्वाच्या निर्णयांना उजाळा दिला.

मावळते वर्ष सव्वाशे कोटी जनतेच्या सामर्थ्याचे वर्ष म्हणून स्मरणात राहील, असे सांगताना पंतप्रधानांनी आयुष्मान भारत, प्रत्येक गावात वीज पोहोचणे, विक्रमी गतीने सुरू असलेले दारिद्य्र निर्मूलन, स्वच्छ भारत अभियानाचा विस्तार, आझाद हिंद सेनेचा साजरा झालेला सुवर्ण महोत्सव यांचा उल्लेख करताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीनिमित्त देशाला जगातील सर्वांत मोठा पुतळा "स्टॅच्यू ऑफ युनिटी' मिळाल्याचा दाखलाही त्यांनी दिला. यासोबतच संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण क्षेत्रातील "चॅम्पियन्स ऑफ अर्थ अवार्ड' हा सर्वोच्च पुरस्कार भारताला मिळाल्याचे सांगताना पर्यावरण रक्षणात भारताच्या प्रयत्नांची जगभरात प्रशंसा झाली. त्याचप्रमाणे, मावळत्या वर्षातच भारताने त्रिस्तरीय आण्विक सुरक्षा यंत्रणा यशस्वीरीत्या विकसित केली असून जमीन, आकाश आणि पाणी या तिन्ही ठिकाणी आपण आण्विक मारक क्षमता मिळविली आहे, असेही मोदी म्हणाले. 

खेळाडूंचा गौरव 

दरम्यान, सामाजिक क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख करताना दुर्गम भागात 15 हजारांहून अधिक यशस्वी प्रसूती करणाऱ्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या दिवंगत सुलागिट्टी नरसम्मा, डॉ. जयाचंद्रन यांच्यासारख्या प्रेरणादायी व्यक्तींनी समाजासाठी आपले आयुष्य वेचल्याचेही उदाहरण मोदींनी दिले.

वैद्यकीय शिबिरांद्वारे गरिबांवर निःशुल्क उपचार करणारे बिजनौर (उत्तर प्रदेश) येथील डॉक्‍टरांच्या योगदानाची प्रशंसा करताना सुवर्णपदक विजेती काश्‍मीरमधील 12 वर्षीय कराटे चॅम्पियन हनाया निसार, सोळा वर्षांची मुष्टीयुद्धपटू रजनी, सायकलवरून विश्‍वभ्रमंती करणारी पुण्याची 20 वर्षीय वेदांगी कुलकर्णी यांचीही तोंडभरून प्रशंसा केली. नव्या वर्षात येणाऱ्या लोहडी, पोंगल, मकरसंक्रांत, उत्तरायण, माघ बिहू या सणांबद्दल शुभेच्छा देतानाच प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com