माफियाराज गेले, विकासपर्व आले : मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माफियाराज गेले, विकासपर्व आले : मोदी
पंतप्रधानांनी फुंकला ‘यूपी’तील प्रचाराचा बिगूल; पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची ‘एअर पॉवर’ #PMModi #UPElection #SakalNews

माफियाराज गेले, विकासपर्व आले : मोदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकताना पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे उद्घाटन केले. समाजवादी पक्षावर थेट निशाणा साधताना पंतप्रधानांनी मागील सरकारांनी लोकांवर अन्याय केल्याचा घणाघात केला. त्या मंडळींनी केवळ स्वतःच्या कुटुंबीयांपुरतेच काम केले. भाजपमुळे मात्र राज्यामध्ये विकासाचे युग अवतरले. गरिबी आणि माफियाराजची जागा विकासाने घेतली आहे. आता साकार झालेला एक्स्प्रेस वे हा मागील काळात झालेल्या विकासाचा साक्षीदार असल्याचे मोदी यांनी नमूद केले.

मोदी म्हणाले की, ‘‘तीन वर्षांपूर्वी पूर्वांचल एक्स्प्रेसवेची पायाभरणी केली, तेव्हा कल्पनाही केली नव्हती की या महामार्गावर विमानातून उतरू. हा राज्याच्या विकासाचा एक्स्प्रेस वे असून उत्तरप्रदेशात उभारलेल्या आधुनिक पायाभूत सेवांचे प्रतिबिंब त्यात दिसते. उत्तरप्रदेश सरकारच्या प्रबळ इच्छाशक्तीचे ते प्रतीक आहे. ज्या मंडळींना उत्तरप्रदेशच्या क्षमतांवर संशय आहे त्यांनी आज सुलतानपूरला येऊन ताकद पाहावी. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उत्तरप्रदेशात अनेक विकास प्रकल्पांची सुरूवात केली. राज्यात जेव्हा विरोधी पक्षाचे सरकार होते तेव्हा स्थानिक पातळीवरून पुरेसे सहकार्य मिळत नव्हते,’’ अशी खंत मोदींनी व्यक्त केली.

त्यांना मतपेढीची भीती

याआधीच्या राज्यातील सरकारांचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींना माझ्या शेजारी उभे राहायला देखील भीती वाटायची आहे. माझ्या शेजारी उभे राहिल्याने आपण आपली मतपेढी गमावू अशी भीती त्यांना वाटत असे. खासदार या नात्याने मी जेव्हा येथे यायचो तेव्हा ही मंडळी माझ्या स्वागतासाठी देखील विमानतळावर हजर नसत. आपण नेमके काय काम केले हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीही नव्हते त्यामुळे त्यांना माझ्याशेजारी उभे राहायला लाज वाटायची अशी टीका मोदी यांनी यावेळी विरोधकांवर केली.

मोदींची एंट्री अन् एअरशोचा थरार

एक्स्प्रेसवर आज हवाई दलाची ताकद पाहायला मिळाली. एअरशोमध्ये मिराज-सुखोई-जग्वार ही लढाऊ विमाने सहभागी झाली होती." मिराज-२०००" या मल्टिरोल लढाऊ विमानांनी आपत्कालीन धावपट्टीवर लॅंडिंग केले. याच ठिकाणी इंधनही भरण्यात आले. यानंतर खास वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या "एएन-३२" या विमानातून थेट सैनिकांना उतरविण्यात आले. यावेळी त्यांनीही चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर केली. या एअरशोमध्ये सुखोई, मिराज, राफेल, एएन-३२, सूर्यकिरण ही लढाऊ विमाने सहभागी झाली होती. खुद्द मोदी हे यावेळी हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर दाखल झाले. अशा प्रकारे विमानातून एंट्री करण्याची कोणत्याही भारतीय पंतप्रधानाची ही पहिलीच वेळ आहे.

"पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांसाठी गर्दी गोळा करण्यासाठी भाजप जनतेचे पैसे खर्च करत आहे. राज्यातील जनतेला भाजपचे जुमला राजकारण चांगलेच माहिती आहे."

- प्रियांका गांधी- वद्रा, सरचिटणीस, कॉंग्रेस

"पूर्वांचल एक्स्प्रेसचे काम हे समाजवादी पक्षाच्या काळात झाले आहे. भाजप सरकार मात्र या कामाचे श्रेय घेते आहे. राज्यातील जनता या मार्गाकडे समाजवादी पूर्वांचल एक्स्प्रेसवे म्हणून पाहील."

- अखिलेश यादव, प्रमुख समाजवादी पक्ष

यांना लाभ

या प्रकल्पामुळे पूर्व उत्तरप्रदेशच्या विकासाला चालना मिळणार असून लखनौ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर या जिल्ह्यांना त्याचा थेट लाभ होईल.

येथून सुरवात

लखनौ- सुलतानपूर महामार्गावर चंदसराई या खेड्यातून हा एक्स्प्रेस वे सुरू होतो, पुढे तो गाझीपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -३१ वरील हैदरिया खेड्याजवळ संपतो. सध्या हा महामार्ग सहापदरी असला तरीसुद्धा भविष्यात तो आठ पदरी होऊ शकतो.

loading image
go to top