पंतप्रधानांनी कर्नाटकातील घोडेबाजाराच्या चौकशीचे आदेश द्यावे : काँग्रेस

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

''आम्हाला विश्वास आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देतील. या भ्रष्टाचाराची चौकशी करतील. ज्यामध्ये त्यांच्या पक्षाचे आमदार सामील होते. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचे दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण करावे''.

-  काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगील्ल

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांना बहुमत मिळाले नाही. भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काल (शनिवार) भाजपला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यादरम्यान भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील घोडेबाजारात लावलेल्या बोलीच्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने केली.

कर्नाटकात सरकार टिकविण्यासाठी भाजपकडून घोडेबाजार केला जात असल्याचा आरोप केला जात होता. तसेच जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी देखील जेडीएसच्या आमदारांना भाजपकडून प्रत्येकी 100 कोटी रुपयांची 'ऑफर' दिल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर आता काँग्रेसने या घोडेबाजारादरम्यान लावलेल्या बोलीच्या चौकशीचे आदेश पंतप्रधानांनी द्यावे, अशी मागणी केली.

''आम्हाला विश्वास आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देतील. या भ्रष्टाचाराची चौकशी करतील. ज्यामध्ये त्यांच्या पक्षाचे आमदार सामील होते. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचे दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण करावे'', अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगील्ल यांनी केली.  

दरम्यान, बी. एस. येडियुरप्पा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर विरोधकांकडून भाजपकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसने या घोडेबाजाराच्या चौकशीची मागणी केली. 

Web Title: PM Modi should order probe into BJP bid for Karnataka horsetrading demanded by Congress