पंतप्रधान मोदी हुशार राजकारणी : देवेगौडा

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 मे 2018

मोदींनी गौडा यांच्याबाबत केलेल्या स्तुतीबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजप आणि जेडीएस या दोन्ही पक्षात छुपी युती असल्याचे सांगितले. 

हुबळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांची स्तुती केल्यानंतर आता देवेगौडा यांनीदेखील पंतप्रधान मोदींची स्तुती केली. ते म्हणाले, ''पंतप्रधान मोदी हे हुशार राजकारणी आहेत. माझे लोकसभेचे सदस्यत्व फक्त त्यांच्या प्रेरणा कौशल्यामुळे आहे''. 

Modi

देवेगौडा म्हणाले, 2014 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी मी सांगितले होते, की मी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे. जर भाजपला स्वबळावर बहुमत मिळाल्यास मी राजीनामा देण्याचा ठरवले होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी मला याची खात्री पटवून दिली. त्यांनी मला सांगितले, की देशाला ज्येष्ठ नेत्यांचे अनुभव आणि सेवांची गरज आहे. पंतप्रधान मोदी हे हुशार राजकारणी आहेत. कर्नाटकच्या राजकारणात काय घडेल याबाबत ते सावधगिरी बाळगून आहेत. त्यांनी माझा आदर आणि सन्मान केला. त्यांनी जे काही सांगितले ते योग्य आहे. मात्र, माझे त्यांच्याशी काहीही मतभेद नाहीत, असे होत नाही. 

देवेगौडा पुढे म्हणाले, आतापर्यंत मी त्यांना चार ते पाचवेळेस मोदींना भेटलो. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह महादायी मुद्यावर बोलण्यास सांगितले. त्यांनी त्याबाबत ऐकले पण केले काहीच नाही. मला आशा होती, की मोदी त्यांच्या अभियानादरम्यान महादायीबाबत बोलतील. मात्र, त्यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही.  

दरम्यान, मोदींनी गौडा यांच्याबाबत केलेल्या स्तुतीबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजप आणि जेडीएस या दोन्ही पक्षात छुपी युती असल्याचे सांगितले. 

Web Title: the PM Modi is a smart politician says Gowda