मोदीजी, पुलवामातील हल्ल्यावेळी केलेले चित्रीकरण हेच का?

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता लवकरच डिस्कव्हरी चॅनेलचा प्रसिद्ध कार्यक्रम "मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या एका भागात दिसणार आहेत. या मालिकेचा विशेष भाग पर्यावरण बदलासंदर्भात असणार आहे. डिस्कव्हरी चॅनेलकडून या संदर्भात घोषणा करण्यात आली असून, या विशेष भागाची शूटिंग बेअर ग्रिल्स यांनी जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्यात पूर्ण केली आहे. या भागात वन्यजीव संरक्षणावर चर्चा केली जाणार आहे. 

नवी दिल्ली : जम्मूमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला दुपारी "सीआरपीएफ'वर दहशतवादी हल्ला होऊन 40 जवान हुतात्मा झाले. पुलवामा हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या वेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. हा धागा पकडत "त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात सायंकाळपर्यंत चित्रीकरणात मग्न होते,' अशी टीका कॉंग्रेसने केली होती. चित्रीकरणातील कर्मचाऱ्यांसह मोदी नौकानयनाचा आनंद लुटत होते, असा आरोप कॉंग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला होता. हे चित्रीकरण म्हणजे डिस्कवरीवर 12 ऑगस्टला प्रसारित होणाऱ्या "मॅन व्हर्सेस वाइल्ड' या कार्यक्रमासाठी होते, अशी चर्चा आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता लवकरच डिस्कव्हरी चॅनेलचा प्रसिद्ध कार्यक्रम "मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या एका भागात दिसणार आहेत. या मालिकेचा विशेष भाग पर्यावरण बदलासंदर्भात असणार आहे. डिस्कव्हरी चॅनेलकडून या संदर्भात घोषणा करण्यात आली असून, या विशेष भागाची शूटिंग बेअर ग्रिल्स यांनी जिम कार्बेट राष्ट्रीय अभयारण्यात पूर्ण केली आहे. या भागात वन्यजीव संरक्षणावर चर्चा केली जाणार आहे. 

मॅन व्हर्सेस वाइल्डच्या विशेष भागाचे प्रसारण 12 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजता केले जाणार आहे. जगातील 180 हून अधिक देशांत डिस्कव्हरी नेटवर्कच्या वाहिन्यांवर हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय वाघ दिवसनिमित्त मालिकेचे आयोजक बेअर ग्रिल्सने ट्‌विटरवरून मोदींच्या विशेष भागाची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपायांसंदर्भात माहितीपट सादर केला जाणार असल्याचे ग्रिल्स यांनी म्हटले आहे. या ट्‌विटबरोबर त्यांनी कार्यक्रमाचा एक लहान व्हिडिओदेखील शेअर केला आहे. डिस्कव्हरी चॅनेलच्या या कार्यक्रमात जगभरातील अनेक नामांकित व्यक्तींनी सहभाग घेतला आहे. जगातील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी हा एक आहे. अनेक देशात स्थानिक भाषेत या कार्यक्रमांचे डबिंग केले जाते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. ग्रिल्स आणि ओबामा यांच्या अलास्कन फ्रंटियरवरील चढाई शूटिंग करण्यात आले होते. ग्लोबल वार्मिंग, नैसर्गिक स्रोत, वन्यजीव संरक्षण या मुद्द्यावर चर्चा केली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi was busy in shooting during the Pulwama attack Congress attacks Modi again