वाऱ्याची दिशा ओळखणारे व्यापारी खरे हवामानतज्ज्ञ: मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 20 एप्रिल 2019

- व्यापारी हे वाऱ्याची दिशा ओळखणारे खरे हवामानतज्ज्ञ असतात
- भाजपने दिल्लीत भरविला व्यापारी महामेळावा
- आपल्यालाच सत्ताप्राप्ती होणार,  मोदींचा आत्मविश्‍वास

नवी दिल्ली : "व्यापारी हे वाऱ्याची दिशा ओळखणारे खरे हवामानतज्ज्ञ असतात,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या "जीएसटी पीडित' वर्गाला आज गोंजारले. भाजपने दिल्लीच्या तालकटोरा आच्छादित मैदानावर भरविलेल्या व्यापारी महामेळाव्यात बोलताना मोदींनी 23 मे रोजी लोकसभा निकाल लागल्यानंतर आपले सरकार "राष्ट्रीय व्यापारी आयोग' स्थापन करेल असे सांगतानाच पुन्हा आपल्यालाच सत्ताप्राप्ती होणार, हा आत्मविश्‍वासही अधोरेखित केला. 

वस्तू व सेव कर कायद्याच्या (जीएसटी) सदोष अंमलबजावणीमुळे देशभरातील व्यापारी आजही त्रस्त आहेत. भाजपचा पारंपरिक मतदार असेला हा वर्ग भाजपपासून दूर जाऊ लागल्याची चिन्हे गुजरातपाठोपाठ तीन राज्यांतही दिसल्याने सावध झालेल्या भाजपने मोदींचे व्यापाऱ्यांना संबोधन घडवून आणले. "जीएसटी'मुळे व्यापार पारदर्शक झाल्याचा व करभरणा दीडपटीने वाढल्याचा दावा त्यांनी केला. 

मोदी म्हणाले, की समाज व्यापारी वर्गावर सामान्यतः संशय घेत असतो. पण माझ्या सरकारने व्यापाऱ्यांना कधीही संशयाच्या नजरेने पाहिले नाही. खरे तर व्यापारी वर्गामुळेच भारत "सोने की चिडिया' म्हणून जगात ओळखला जात होता. 2014 मध्ये पंतप्रधान नसतानाही मी व्यापाऱ्यांचा मेळावा घेतला. मात्र तेव्हा प्राप्तिकर छापे पडण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांची संख्या कमी होती. तेव्हा देशात असे सरकार होते की जे फक्त कायद्याची भाषा करत होते. मात्र माझ्या सरकारने गेल्या पाच वर्षांत तब्बल दीड हजार जुन्या व अनावश्‍यक कायदे रद्द केले. कॉंग्रेसच्या काळाबाजारवाल्यांनी महागाईचा लाभ करून घेतला. हा पक्ष उद्योजकांना, साऱ्या व्यापाऱ्यांना रोजच्या रोज चोर म्हणतो, अशी टीका त्यांनी केली. 

Web Title: PM Narendra Modi to address traders convention in New Delhi