Video : लालकृष्ण अडवानी @93; मोदी, अमित शहांनी दिल्या शुभेच्छा

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांचा आज 92 वा वाढदिवस आहे. 

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांचा आज 92 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

अडीच वर्षांचा प्रस्ताव असेल तरच बोला; शिवसेना आक्रमकच

उपराष्ट्रपतींनीही दिल्या शुभेच्छा
आज, सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील अडवानी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे नेते जे. पी. नड्डा तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूदेखील उपस्थित होते. सुरुवातीला नरेंद्र मोदी आणि अमित शहा अडवानी यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे आगमन झाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांनी बसण्यासाठी आपली जागा दिली. यावरून सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे काहींनी कौतुक केले आहे. 

वाजपेयींची कविता आणि संजय राऊत यांचं सूचक ट्विट

सक्रीय राजकारणापासून दूर
जनसंघाच्या स्थापनेपासून लालकृष्ण अडवानी सक्रीय राजकारणात सक्रीय आहेत. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पायाभरणीत मोलाचा वाटा उचलला. आज, भाजप केंद्रात सत्तेवर असला तरी, त्याचा पाया अडवानी यांनी रचला आहे. अडवानी आठवेळा लोकसभेचे सदस्य होते. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री, उपपंतप्रधान या मोठ्या पदांवरही काम केले आहे. विरोधीपक्षात असताना त्यांच्याकडे विरोधीपक्ष नेते पदाची धुरा होती. राम जन्मभूमी आंदोलन, बाबरी मशिद उध्वस्त प्रकरण आणि रथयात्रेमुळे अडवानी वादात होते.  तसेच पाकिस्तानच्या स्थापनेसाठी आग्रही असलेल्या बॅरिस्टर जिन्हा यांना धर्मनिरपेक्ष म्हटल्यामुळेही अडवानी वादात सापडले होते. सध्या अडवानी यांच्या पारंपरिक गांधीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अमित शहा करत आहेत आणि अडवानी सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi and amit shah greets bjp leader l k advani on his birthday