मुस्लिमांना धोका नाही; मोदींची ग्वाही

टीम ई-सकाळ
Monday, 23 December 2019

प्रिय भारतीय तरुणांनो, 
मोदी आणि शहांनी तुमचे भवितव्य उद्‌ध्वस्त केले आहे. अर्थव्यवस्थेस त्यांनी पोचविलेली क्षती, नोकऱ्यांची कमतरता आदी मुद्‌द्‌यांवरून ते तुमच्या क्रोधाला सामोरे जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच ते आमच्या प्रिय भारतभूमीला विभागण्याचे काम करत असून, द्वेषाच्या मागे लपत आहेत. प्रत्येक भारतीयांप्रती प्रेम व्यक्त करत आपण त्यांचा पराभव करू शकतो. 
- राहुल गांधी, नेते कॉंग्रेस 

नवी दिल्ली : "सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीशी (एनआरसी) भारतीय मुसलमानांचा काहीही संबंध नाही. मुसलमानांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठविले जाईल, असे चुकीचे सांगितले जात आहे. कॉंग्रेस आणि शहरी नक्षलवादी भ्रम पसरवित आहेत. देशाची दिशाभूल करणाऱ्या अफवांपासून सावध राहा'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरात उसळलेल्या उद्रेकावर मौन सोडले. विरोधकांचे टेप रेकॉर्ड ऐकू नका, आमचे ट्रॅक रेकॉर्ड पाहा, असे आवाहनही मोदींनी जनतेला केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील अवैध वसाहतींना कायदेशीर दर्जा देणारे विधेयक केंद्र सरकारने संमत केल्याबद्दल दिल्ली भाजपतर्फे झालेल्या आभार सभेतून पंतप्रधान मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. मात्र, सुधारित नागरिकत्व कायदा आणि "एनआरसी'वरून देशभरात सुरू असलेला गदारोळ त्यांच्या दीड तासाच्या भाषणाच्या केंद्रस्थानी होता. कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी पसरविलेला संभ्रम हा या गोंधळाच्या मुळाशी असल्याचे वारंवार सांगून मोदींनी आपले सरकार मुस्लिमविरोधी नसल्याचे सांगितले. दरम्यान, नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी आपल्या राज्यातील कायदेतज्ज्ञांना हे शक्‍य आहे काय, असे विचारावे, असे आवाहन देत मोदींनी कायदापालन बंधनकारक असल्याचे सुचविले. परंतु, "एनआरसी' लागू करणार की नाही, यावर थेट बोलण्याचे मोदींनी टाळले. त्याचप्रमाणे अकाली दल, संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पक्ष या एनडीएतील घटक पक्षांनी घेतलेल्या विरोधी भूमिकेवरही मोदींनी मौन पाळले. 

सरकारकडून धार्मिक व सामाजिक ऐक्यास धोका : शरद पवार

गरिबांना लक्ष्य करू नका 
पंतप्रधान म्हणाले, ""कागदपत्रे, प्रमाणपत्रांच्या नावाखाली मुस्लिमांमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. कल्याणकारी योजना राबवताना आम्ही कागदपत्रांचे बंधन घातले नाही, कोणालाही धर्म विचारला नाही. विरोधकांचे राजकारण आणि हेतू देशाला कळून चुकला आहे. माझे पुतळे जाळा, पण देशाची संपत्ती जाळू नका.'' पोलिसांवर हल्ला केला जात आहे आणि देशातील शंभर वर्षे जुन्या पक्षाचे नेते उपदेश करत आहेत. मात्र, शांततेचे आवाहन करणारे दोन शब्द बोलायला ते तयार नाहीत. याचाच अर्थ हिंसेला आणि पोलिस, निर्दोषांवर होत असलेल्या हल्ल्यांना तुमची मूक संमती आहे, असा प्रहारही पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधींच्या आवाहनावर केला. 

डिटेंशन सेंटर नाही 
एनआरसी कॉंग्रेसच्या सत्ताकाळात आणले तेव्हा ही मंडळी झोपली होती काय, असा सवाल मोदींनी केला. "एनआरसी संसदेत आलेला नाही, मंत्रिमंडळापुढेही आलेला नाही आणि त्याचे नियमदेखील बनविण्यात आलेले नाहीत. तरीदेखील बागुलबुवा उभा केला जात असून बालिशपणे वक्तव्ये केली जात आहेत. आपले सरकार आल्यापासून आजपर्यंत एनआरसीबाबत कोठेही चर्चा झालेली नाही. केवळ सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर आसाममध्ये आणावे लागले. तरीदेखील खोटेनाटे पसरविले जात आहे. घटना दुरुस्ती, एनआरसी नेमके काय आहे याचा विचार करा. भारतीय नागरिकांचा नागरिकत्व कायदा आणि एनआरसीशी काहीही संबंध नाही. कोणीही मुसलमानांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठवणार नाही आणि असे काही सेंटरही अस्तित्वात नाही, असा निर्वाळा मोदींनी दिला. निर्वासित आणि घुसखोर यांच्यात फरक असून निर्वासित स्वतःची ओळख उघडपणे सांगतो. घुसखोर स्वतःची ओळख लपवून ठेवतात. आपले वास्तव समोर येण्याची भीती आता घुसखोरांना वाटू लागली असल्याचा चिमटाही मोदींनी काढला. 

Image result for CAA

मोदींचा हल्लाबोल - 
- नागरिकत्व कायदा नागरिकता देण्यासाठी, हिसकावण्यासाठी नव्हे. 
- गांधीजींच्या विचारांनुसार हा कायदा आणला. गांधी आडनावाचा फायदा घेणाऱ्यांनी हे समजून घ्यावे. 
- डॉ. मनमोहनसिंग, तरुण गोगोई, अशोक गेहलोत, प्रकाश कारत या नेत्यांनी निर्वासितांना नागरिकत्व देण्याची मागणी केली. 
- संयुक्त राष्ट्रसंघात जनमत संग्रहाची भाषा करणाऱ्या ममतादीदी बांगलादेशी घुसखोरांना थांबविण्याची मागणी करत होत्या. 
- मुस्लिम देशांकडून मला मिळणाऱ्या पाठिंब्याने कॉंग्रेस आणि सहकारी पक्ष बिथरले आहेत. 
- मला मार्गातून हटविण्यासाठी हरप्रयत्न सुरू आहेत. 
- जनतेचा आशीर्वाद सर्व षडयंत्रांचा बुरखा फाडेल. 

पंतप्रधान मोदी उवाच... 
- देशातील संसदेचा सर्वांनी आदर करावा. 
- कॉंग्रेस आणि शहरी नक्षलवादी कायद्याबाबत चुकीचा प्रचार करीत आहेत. 
- माझे प्रतीकात्मक पुतळे जाळा; पण गरिबांना त्रास देऊ नका 
- देशातील 130 कोटी भारतीय नागरिकांचा नव्या कायद्याशी संबंध नाही. एनआरसीबाबतही चुकीची माहिती पसरविली जात आहे. 
- देशाच्या सुरक्षेसाठी जिवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांनाच तुम्ही मारहाण करत आहात. अडचण आल्यास पोलिस धर्म-जात न पाहता सर्वांना मदत करतात. 
- गेल्या पाच वर्षांत सरकारने दीड कोटी गरिबांसाठी घरे बांधली, त्या वेळीही धर्म-जात विचारली नाही. 
- ममता बॅनर्जी, मनमोहनसिंग हे काही वर्षांपूर्वी निर्वासितांबद्दल वेगळे बोलत होते, आता वेगळे बोलत आहेत. ते का बदलले? 

Image

प्रिय भारतीय तरुणांनो, 
मोदी आणि शहांनी तुमचे भवितव्य उद्‌ध्वस्त केले आहे. अर्थव्यवस्थेस त्यांनी पोचविलेली क्षती, नोकऱ्यांची कमतरता आदी मुद्‌द्‌यांवरून ते तुमच्या क्रोधाला सामोरे जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच ते आमच्या प्रिय भारतभूमीला विभागण्याचे काम करत असून, द्वेषाच्या मागे लपत आहेत. प्रत्येक भारतीयांप्रती प्रेम व्यक्त करत आपण त्यांचा पराभव करू शकतो. 
- राहुल गांधी, नेते कॉंग्रेस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi commented about CAA