माजी पंतप्रधानांची काँग्रेसने बदनामी केली- पंतप्रधान मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

देशात अशी एक जमात आहे की त्य जमातीने अनेक माजी पंतप्रधानांच्या बदनामीची मोहीमच राबवली. मोरारजी देसाई काय पितात, कोणते पंतप्रधान भर सभेत झोपतात अशा भलत्याच गोष्टींचा गवगवा केला गेला व त्यांचे खरे काम कळूच नये अशी व्यवस्था बनवली गेली.

नवी दिल्ली- या देशात अशी एक जमात आहे की त्य जमातीने अनेक माजी पंतप्रधानांच्या बदनामीची मोहीमच राबवली. मोरारजी देसाई काय पितात, कोणते पंतप्रधान भर सभेत झोपतात अशा भलत्याच गोष्टींचा गवगवा केला गेला व त्यांचे खरे काम कळूच नये अशी व्यवस्था बनवली गेली.

लालबहादूर शास्त्री परत आले असते तर त्यांच्याबाबतही तशीच व्यवस्था तयारच ठेवली गेली असती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.24) काॅंग्रेसच्या घराणेशाहीवर पुन्हा हल्ला चढवला. निमित्त होते, माजी पंतप्रदान चंद्रशेखर यांच्यावर राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश यांनी लिहीलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. विशिष्ट पंतप्रधान नव्हे तर या देशातील साऱयाच माजी पंतप्रधानांचे कार्य पुढच्या पिढीला समजावे यासाठी दिल्लीत त्यांचे भव्य संग्रहालय उभारण्याचा निर्धार मी केला आहे, अशीही घोषणा मोदींनी केली.

काॅंग्रेसने घराण्याबाहेरच्या पंतप्रधानांची कशी बदनामी केली यावर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान म्हणाले की चंद्रशेखर यांच्या विचारांबाबत मतभेद होऊ शकतात पण त्यांच्या कन्याकुमारी ते राजघाट या 4000 किमीच्या पदयात्रेबीही दिल्लीतील या जमातीने प्रचंड बदनामी केली हे वेदनादायी आहे. एका गुप्तवार्ता पोलिसामुळे चंद्रशेखर यांचे सरकारच कोसळले हे विचित्रच आहे. मात्र पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यापूर्वी चंद्रशेखर यांनी आपले गुरूजी म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांचा सल्ला घेण्यासाठी थेट नागपूरला जो फोन केला तो मीच उचलला होता.

स्वातंत्र्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व सरदार पटेल यांचीही बदनामी, यांना काय कळते, हे तर तसेच आहेत, अशा अफवा पसरवून त्यांचीही प्रतिमा बदनाम केली गेली असे सांगून पंतप्रधान म्हणाले की या देशातील थोर नेत्यांच्या बदनामीची मोहीमच चालविली गेली. प्रस्तावित संग्रहलायाद्वारे त्यांचे कार्यही प्रचंड तोलामोलाचे आहे हे नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न होणार आहे. देशात नवी राजकीय संस्कृती आणण्याची नितांत गरज आहे.
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, हरिवंश व पुस्तकाचे सहलेखक हरिदत्त वाजपेयी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, चंद्रशेखर यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pm Narendra Modi Criticise Congress on Ex Prime minister