काँग्रेस नेते माझी कबर खोदण्याची स्वप्नं पाहताहेत आणि मी..; PM मोदींचा जोरदार हल्लाबोल I Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

एक्स्प्रेस वे'चं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) काँग्रेस पक्षावर (Congress Party) जोरदार हल्लाबोल केला.

Narendra Modi : काँग्रेस नेते माझी कबर खोदण्याची स्वप्नं पाहताहेत आणि मी..; PM मोदींचा जोरदार हल्लाबोल

PM Modi Karnataka Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. मंड्यात पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी रोड शो केला. त्यानंतर मोदींनी बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे (Bangalore-Mysore Expressway) देशाला समर्पित केला.

एक्स्प्रेस वे'चं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) काँग्रेस पक्षावर (Congress Party) जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'काँग्रेस नेते माझी कबर खोदण्याची स्वप्नं पाहण्यात व्यस्त आहेत. मात्र, मी एक्स्प्रेस वे'चं उद्घाटन करण्यात आणि देशातील गरीब लोकांसाठी काम करण्यात व्यस्त आहे.'

मोदी पुढं म्हणाले, सागरमाला आणि भारतमाला सारख्या प्रकल्पांनी कर्नाटक आणि देश आज बदलत आहे. जग कोविडशी झुंजत असताना, भारतानं पायाभूत सुविधांचं बजेट अनेक पटीनं वाढवून मोठा संदेश दिला. 2014 पूर्वी काँग्रेस सरकारनं गरीब कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि त्यांच्या विकासाचा पैसा लुटला, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला.

आता बेंगळुरू-म्हैसूर प्रवास होणार 75 मिनिटांत

या द्रुतगती मार्गामुळं बेंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे 3 तासांवरून 75 मिनिटांवर येईल. प्रकल्प NH-275 च्या बेंगळुरू-निदघट्टा-म्हैसूर विभागाच्या 6-लेनिंगवर सुरु आहे. हा द्रुतगती मार्ग दोन्ही शहरांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे.

पंतप्रधान मोदींनी आज म्हैसूर-खुशालनगर 4 लेन महामार्गाची पायाभरणी केली. सुमारे 4130 कोटी रुपये खर्चून 92 किमी पसरलेला हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. कुशलनगरची बेंगळुरूशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यात आणि प्रवासाचा वेळ सुमारे 5 वरून फक्त 2.5 तासांपर्यंत कमी करण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

दरम्यान, या सर्व प्रकल्पांमुळं प्रदेशातील प्रत्येकाच्या विकासाला गती मिळेल आणि समृद्धीचा मार्ग खुला होईल, असंही पंतप्रधान म्हणाले. PM मोदींनी मंड्यात आज रोड शो सुरू करताच लोकांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं. दरम्यान, मोदींनीही जनतेवर पुष्पवृष्टी केली.