काँग्रेसने मला छळले : पंतप्रधान

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019

''नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 पासून चालू आहे. जमीन, इन्कम टॅक्सची माहिती काँग्रेसला कोणालाही कळू द्यायचे नव्हती. त्यांनी तपासात सहकार्यही केले नाही. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे 'रिमोट कंट्रोल' सरकार होते''.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : ''नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 पासून चालू आहे. जमीन, इन्कम टॅक्सची माहिती काँग्रेसला कोणालाही कळू द्यायचे नव्हती. त्यांनी तपासात सहकार्यही केले नाही. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे 'रिमोट कंट्रोल' सरकार होते'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. तसेच मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने विविध माध्यमातून मला 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.

रामलीला मैदान येथील भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''काँग्रेस विकासकामांच्या प्रक्रियेच्या मार्गात अडथळे आणत आहे. 2014 पूर्वी बँकेकडून कर्ज घेण्याच्या दोन प्रक्रिया होत्या. एक सामान्य प्रक्रिया होती आणि एक होती काँग्रेस प्रक्रिया. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्ज देण्याची काँग्रेसची प्रक्रिया बंद केली. देशाला मजबूत सरकार हवे आहे. पण विरोधकांना कुटुंब, नातेवाईकांचे भले करण्यासाठी संरक्षण करारामध्ये दलाली खाण्यासाठी मजबूर सरकार हवे आहे. मात्र, हा 'चौकीदार' थांबणार नाही. आता तर सुरवात झाली आहे. चोर देशात असो किंवा विदेशात चौकीदार एकालाही सोडणार नाही''.

दरम्यान, भारताला आपले लक्ष्य गाठायचे आहे. दोन खासदार असलेल्या पक्षाचे आज विशाल स्वरुप झाले आहे. देशातील 16 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. देश प्रामाणिक मार्गाने चालत आहे. मात्र, यामध्ये विरोधी पक्ष सातत्याने अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. देशाला 'प्रधानसेवक' कसा हवा ते जनतेनेच ठरवायला हवे. रात्र-दिवस मेहनत करणारा की, कधीही सुट्टीवर जाणार 'प्रधानसेवक' हवा ते ठरवावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: PM Narendra Modi Criticizes Rahul Gandhi and Congress Party