
PM Modi News: "नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर नरेंद्र मोदींच्या मित्राच्या मुलाकडून नरेंद्र मोदींचा फोटो भेट"
PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज काल भारत ऑस्ट्रेलियामधला क्रिकेट सामना पाहायला गेले होते.
अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना खेळण्यात आला. यावेळी बीसीसीआयच्या अध्यक्षांनी मोदींचं केलेलं स्वागत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हा सामना बघण्यासाठी आलेल्या पंतप्रधान मोदी यांना बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी मोदींचाच फोटो देऊन स्वागत केलं. यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
अनेकांनी यावरुन टीकाही केली आहे. "नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर नरेंद्र मोदींच्या मित्राच्या मुलाने नरेंद्र मोदींचा फोटो भेट दिला", असे ट्वीट करत अनेकांनी या सत्काराची थट्टा केली आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्यासोबत नरेंद्र मोदी स्टेडिअममधल्या फ्रेंडशिप हॉल ऑफ फेमची सफर घडवली.
यावेळी एक पोस्टरही त्यांना दाखवण्यात आलं. भारतातल्या प्रसिद्ध खेळाडूंच्या फोटोंपासून तयार झालेला पंतप्रधान मोदींचा फोटो या पोस्टरवर आहे.
अनेकांनी पंतप्रधान मोदींचं समर्थनही केलं आहे. हे करताना काँग्रेसचा काळ आणि गांधी परिवारावरही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. गांधी परिवाराने आपल्या प्रत्येक सरकारी कामावर आपलं नाव टाकलं आहे. इंदिरा गांधींना भारतरत्न पुरस्कार कसा मिळाला, असा प्रश्नही काही जणांनी यावेळी विचारला आहे.