तयारीला वेळ दिला नाही, हे त्यांचे दु:ख : मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली, : "काही लोक म्हणतात की सरकारने पुरेशी तयारी केली नव्हती. त्यांचे खरे दुःख हे आहे की सरकारने त्यांना "तयारी' करण्यासाठी वेळच दिला नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांवर तुटून पडले. यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी मोदींनी संसदेची माफी मागण्याची मागणी लावून धरली आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प केले.

नोटाबंदीला दोन आठवडे उलटल्यावरही सर्वसामान्यांचे पैशांसाठीचे हाल थांबत नसल्याने चित्र असून, या अस्वस्थतेतून पंतप्रधानांच्या प्रत्येक भाषणात नोटाबंदीचे समर्थन करण्याचा मुद्दा अती-आक्रमकतेने येऊ लागल्याचे निरीक्षण मांडले जाते.

राज्यघटना दिनाच्या पूर्वसंध्येला संसद परिसरात आयोजित केलेल्या कॉफी टेबल बुक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी राज्यघटनादिनाविना प्रजासत्ताक दिन अपूर्ण असल्याचे सांगितले. या वेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व भाजप खासदार मोठ्या संख्येने हजर होते. घटनेच्या कलमांशी नव्हे, तर गाभ्याशी एकरूप झाले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. मात्र, मोदींची गाडी राज्यघटनेचे महत्त्व सांगता सांगता काही मिनिटांतच नोटाबंदीकडे वळाली.

ते म्हणाले, ""देश सध्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी लढाई लढतो आहे. सर्वसामान्य नागरिक या लढाईतील सैनिक झाला आहे. घटनेचा दुरुपयोग करून काही लोकांनी देशाला रसातळाला नेले, अशी सर्वसामान्य माणसाची भावना आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला लोकांचा विरोध नाही. काही लोक मात्र टीका करत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, सरकारने याची पूर्वतयारी केली नव्हती. त्यांचे दुःख हे आहे की सरकारने त्यांना तयारी करायला वेळच दिला नाही. जर तसा दिला असता तर हेच लोक म्हणाले असते की, मोदींसारखे कोणीच नाही.''

संसदेतील हे भाषण करून पंतप्रधान भटिंडा व हैदराबादच्या कार्यक्रमांसाठी निघून गेले. मात्र, त्यांच्या उद्गारांमुळे संसदेतील वातावरण आणखी तापले. राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व बसप नेत्या मायावती, तृणमूलचे डेरेक ओब्रायन यांच्यासह सारे विरोधक मोदींवर अक्षरशः तुटून पडले. आझाद म्हणाले की, मोदी हे विरोधी पक्षीयांना सरसकट काळा पैसा दडविणारे ठरवित आहेत. हे आक्षेपार्ह आहे. पंतप्रधानांनी संसदेचा अपमान केला असून, त्यांनी त्वरित सभागृहात येऊन माफी मागितली पाहिजे.

मोबाईल शॉपिंगला प्रोत्साहन
नोटाबंदीनंतर काही नगरपालिकांचे ताळेबंद पाहता, ज्यांचा कारभार तीन-साडेतीन कोटी रुपये होत असे, तो या निर्णयानंतर थेट 13 हजार कोटींवर गेला आहे, असे मोदींनी सांगितले. शंभर कोटींहून अधिक मोबाईलधारक असलेल्या आपल्या देशाने आता मोबाईलद्वारे आर्थिक व्यवहार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असे सांगताना त्यांनी मोबाईल शॉपिंगलाही प्रोत्साहन दिले.

Web Title: PM Narendra Modi hits out at opposition on demonetisation