सुटीत सुनावणी घेण्याच्या निर्णयाची मोदींकडून स्तुती

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

डिजिटल फायलिंगमुळे एखाद्या खटल्यासंदर्भातील कागदपत्रांची हाताळणी सहज शक्‍य होईल. तसेच पक्षकारांना खटला दाखल करण्याची प्रक्रिया, न्यायालयाचे शुल्क आणि इतर माहितीही सहजपणे उपलब्ध होईल. 
- जे. एस. खेहर, सरन्यायाधीश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उन्हाळ्याच्या सुटीदरम्यान खटल्यांची सुनावणी घेण्याच्या निर्णयाबद्दल न्यायपालिकांची स्तुती केली आणि या निर्णयामुळे लोकांमध्ये त्यांच्या कामाविषयीची जबाबदारीची जाणीव भक्कम होईल, असे मत व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयातील एकात्मिक प्रकरण व्यवस्थापन माहिती प्रणालीचा बुधवारी प्रारंभ करण्यात आला. या प्रणालीमुळे सर्वोच्च न्यायालयात ऑनलाइन याचिका दाखल करता येणार आहे. बदलत्या काळाबरोबर राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार करा, असे आवाहन मोदींनी या वेळी केले. 

कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये बदल घडवण्याची मोठी ताकद तंत्रज्ञानात आहे. या सगळ्याचा विचार करता आपल्याला माहिती व तंत्रज्ञान (आयटी) आणि भारतीय गुणवत्ता (आयटी) यांची सांगड घालणे हेच भविष्यातील भारत घडवण्याचे सूत्र आहे, असे नमूद करत पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा डिजिटलीकरणाचा नारा दिला. 

अंत:प्रेरणेतूनच एखाद्या बदलाची सुरवात होते. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू पडते. तंत्रज्ञानाबद्दल केवळ काही लोकांनीच उत्साह दाखवून चालणार नाही. तंत्रज्ञान हे व्यापक स्तरावर स्वीकारले गेले पाहिजे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. 

ई-गव्हर्नन्स हा खूप सोपा, प्रभावी आणि व्यवहार्य पर्याय आहे. याशिवाय, ते पर्यावरणपूरकही आहे, असे सांगत मोदींनी डिजिटल कामकाजाचे आणि व्यवहारांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: PM Narendra Modi launches Supreme Court's paperless, digital management system