'इन्स्टाग्राम'वर नरेंद्र मोदींना सर्वाधिक पसंती

पीटीआय
गुरुवार, 13 एप्रिल 2017

ट्रम्प यांचे 63 लाख फॉलोअर्स आहेत. तर मोदी यांचे 69 लाख फॉलोअर्स आहेत. मोदींच्या प्रत्येक पोस्टला सरासरी 2 लाख 23 हजार जण प्रतिक्रिया आणि लाईक्‍सच्या स्वरुपात प्रतिसाद देत असल्याचेही अभ्यासात आढळून आले.

नवी दिल्ली - "इन्स्टाग्राम' या फोटो शेअरिंग ऍपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यांचे इन्स्टाग्रामवर 69 लाख फॉलोअर्स झाले असून ते जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते ठरले आहेत.

जनसंपर्काच्या क्षेत्रात काम करणाऱ्या बुर्सोन-मार्सटेलर या कंपनीने "वर्ल्ड लिडर्स ऑन इन्स्टाग्राम' या विषयाचा अभ्यास केला. या अभ्यासात जगभरातील विविध देशांचे प्रमुख आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या 325 इन्स्टाग्राम खात्यांची मागील एक वर्षभरातील स्थिती अभ्यासण्यात आली. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकत मोदींनी फॉलोअर्सच्या बाबतीत पहिले स्थान मिळविल्याचे दिसून आले. ट्रम्प यांचे 63 लाख फॉलोअर्स आहेत. तर मोदी यांचे 69 लाख फॉलोअर्स आहेत. मोदींच्या प्रत्येक पोस्टला सरासरी 2 लाख 23 हजार जण प्रतिक्रिया आणि लाईक्‍सच्या स्वरुपात प्रतिसाद देत असल्याचेही अभ्यासात आढळून आले.

"जगभरातील नेते जागतिक, सामाजिक, राजकीय विषयासंदर्भात ऑनलाईन माध्यमातून संवाद साधतात. शिवाय या माध्यमातून ते स्वत:चे व्यक्तिमत्व आणि सर्जनशीलताही दाखवतात', अशा प्रतिक्रिया बुर्सोन-मार्सटेलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन बेअर यांनी व्यक्त केल्या.

Web Title: PM Narendra Modi most followed world leader on Instagram