मोदींनी घेतला दांडीबहाद्दर मंत्र्यांचा 'क्लास'

मोदींनी घेतला दांडीबहाद्दर मंत्र्यांचा 'क्लास'

नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये ज्या मंत्र्यांची आळीपाळीने म्हणजेच रोस्टर ड्यूटी लावली जाते या वेळी बरेच मंत्री गैरहजर असतात. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. संसदेत उपस्थित राहणे या जबाबदारीपासून मंत्री असोत की खासदार, ते पळू कसे शकतात, असा प्रश्‍न मोदींनी विचारला. भाजप संसदीय पक्षाची बैठक बालयोगी सभागृहात आज सकाळी झाली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीतील माहिती दिली. 

संसद अधिवेशनाच्या काळात सभागृहांमध्ये हजर राहत जा, असे पंतप्रधानांनी 2014 पासून अनेकदा सांगूनही सत्तारूढ खासदार आणि मंत्र्यांवर त्याचा अपेक्षेइतका परिणाम होत नसल्याचे पाहून मोदीही वैतागल्याचे चित्र आहे. आजच्या बैठकीत याचेच प्रतिबिंब उमटले. ज्या मंत्र्यांची रोस्टर ड्यूटी लावलेली असेल ते सभागृहात हजर न राहणे हा निष्काळजीपणा आणि बेपर्वाई आहे. ती सहन केली जाणार नाही, असा इशारा मोदींनी दिला. 

लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज चालू असेल तेव्हा किमान कॅबिनेट मंत्री उपस्थित राहणे अनिवार्य असते. राज्यसभेत विशेषतः दुपारच्या वेळेत अनेकदा मंत्र्यांचा दुष्काळ जाणवतो. लोकसभेत तर तोंडी तलाक विधेयकाच्या वेळी सत्तारूढ खासदारांनीच उपस्थिती पुरेशी नसल्याचे पाहून भाजपचा गोंधळ उडाला होता. या पार्श्‍वभूमीवर आज पंतप्रधानांनी संसदीय भाजपमधील दांडीबहाद्दरांचे काम पुन्हा टोचले आहेत. 

जलसंकटावर चर्चा करा 

पंतप्रधानांनी आज भाजप खासदारांनी राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक संवादही स्थापन करण्याच्या गरजेवर भर दिला. जलसंकटाबाबत दिल्ली आणि आपल्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांची संवाद चर्चा करा, असे सांगतानाच त्यांनी पिछाडीवर असलेल्या 115 जिल्ह्यांबाबत भाजप खासदारांनी काम करावे, असेही आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com