मोदींनी चेक केली मंत्र्यांची कुंडली; लवकरच खांदेपालट होण्याची शक्‍यता!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 डिसेंबर 2019

पुढील महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदी-2 मंत्रिमंडळाचा पहिला खांदेपालट व फेरबदल होण्याची शक्‍यता आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता.21) आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या बैठकीत विविध मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यात मंत्रालयांच्या कामगिरीबाबत सादरीकरणही करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहा महिन्यांनंतर मोदी-2 सरकारच्या विविध मंत्र्यांचे आगामी 'व्हिजन' काय असेल याची कल्पना घेण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीनंतर मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जाईल व प्रस्तावित मंत्रिमंडळ फेरबदलात खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर कुऱ्हाड कोसळू शकते, असेही सांगितले जाते. याबाबतचे वृत्त 'सकाळ'ने सोमवारीच दिले होते. 

- बुलेट ट्रेन कर्मचाऱ्यांना आता जपानी भाषेचे धडे

मोदी यांनी शनिवारी सकाळी बोलावलेली ही बैठक मंत्र्यांच्या कामकाजाचे समीक्षण करण्यासाठी होती. सायंकाळपर्यंत चाललेल्या या मंथनात मोदींनी मंत्र्यांना काही तिखट प्रश्‍नही विचारल्याचे समजते. या महिन्याच्या अखेरीस अशीच आणखी एक बैठक पंतप्रधान घेणार आहेत. नेहमीच्या मंत्रिमंडळ बैठकीपेक्षा ही वेगळी व विशेष बैठक होती. नेहमीची मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी 24 तारखेला होईलच, असे सांगण्यात येत आहे.

- हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश

कृषी, ग्रामविकास व सामाजिक कल्याणाच्या योजनांबाबत त्या त्या मंत्रालयाच्या सचिवांनी सादरीकरण करणे यात अपेक्षित होते. या बैठकीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या संतप्त प्रदर्शनांचा विषयही चर्चेला आला व गृहमंत्र्यांच्या एका स्पष्ट वाक्‍यानंतर (वन लाइनर) लगेचच तो थांबला असेही कळते. सूत्रांनी सांगितले की मोदी सरकारच्या विशेष योजनांच्या अंमलबजावणीत विविध मंत्रालयांनी कसे योगदान दिले आहे याचा आढावा घेण्यात आला. 

- भारताचा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न : हुसेन दलवाई

खांदेपालटाची शक्‍यता 

दरम्यान, पुढील महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदी-2 मंत्रिमंडळाचा पहिला खांदेपालट व फेरबदल होण्याची शक्‍यता आहे. यात काही मंत्र्यांचा खातेबदल व काहींना नारळही दिला जाण्याची चिन्हे आहेत. काही मंत्रालयांच्या कामगिरीबाबत पंतप्रधान नाराज आहेत.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील ठिणगी जामिया विद्यापीठात पडली व देशभरातील 2000 विद्यापीठे-शिक्षण संस्थांत निषेधाचा वणवा पसरला. तो वेळीच आटोक्‍यात आणण्यासाठी संबंधितांकडून म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत, असा भाजप नेतृत्वाचा आक्षेप असल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi reviewed the functioning of various ministers